शिक्षणाचा खेळखंडोबा! एक ते दाेन लाख द्या अन् पदवी घ्या; पदव्या विकण्याचा गाेरखधंदा जाेमात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 01:10 PM2022-07-05T13:10:09+5:302022-07-05T13:14:25+5:30
विद्येच्या माहेरघरातच सुरू असलेला पदव्या विक्रीचा हा बाजार विद्यार्थ्यांना लाखाेंचा गंडा घालणारा
ज्ञानेश्वर भोंडे
पुणे : अगदी काही हजारांपासून एक ते दाेन लाख रुपये द्या अन् हवी ती पदवी घेऊन जा, असा गाेरखधंदाच काही संस्थांनी थाटला आहे. विद्येच्या माहेरघरातच सुरू असलेला पदव्या विक्रीचा हा बाजार विद्यार्थ्यांना लाखाेंचा गंडा घालणारा आहे. फसवणूक हाेण्याचा धाेका असतानाही अनेकजण आकर्षक जाहिरातीला बळी पडत असल्याचा प्रकार समाेर येत आहे.
‘भारतीय तकनिकी अनुसंधान आणि व्यवसाय प्रबंधन अध्यायन संस्थान’ या नावाने अहमदनगर येथे पैसे घेऊन बनावट पदव्या विक्रीचा धंदा सुरू असल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. या प्रकरणी काेथरूड पाेलिसांनी संबंधितांवर गुन्हाही दाखल केला आहे. त्यावरून हा धंदा किती फाेफावला आहे हे दिसून येते. याला बळी पडणारेही तितकेच जबाबदार असले तरी त्यांची हाेणारी आर्थिक फसवणूक चिंतेची बाब आहे.
पुण्यातही याआधी असे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यांच्यावर कारवाई हाेऊन ते बंद पडले असले तरी अजूनही या प्रकारांना हवा तितका आळा बसलेला नाही. पुण्यात सन २०१८ मध्ये पुरंदर विद्यापीठ नावाने अनेक पदव्या विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला हाेता. हे विद्यापीठ म्हणजे सासवडमध्ये तीन खाेल्या आणि एक शिपाई इतकेच मर्यादित हाेते. त्यांनी तब्बल अडीच हजार विद्यार्थ्यांना बाेगस पदव्या वाटप केल्या हाेत्या. या तथाकथित संस्थेवर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला हाेता.
अशी मिळते डीग्री
- इंजिनिअरिंग, बी.टेक., एम.टेक. पासून अगदी डाॅक्टरेटच्या पदव्या मिळतील, अशी जाहिरातबाजी संबंधित संस्था शक्यताे साेशल मीडियाद्वारे करतात.
- संबंधित क्षेत्रात पदवी मिळवू इच्छिणारे लागलीच फाेन करतात. त्यावर संबंधित संस्था भेटायला बाेलून किंवा फाेनवरच थेट पैसे भरा आणि हवी ती डिग्री घेऊन जा असे सांगतात. या पदव्या किंवा पदविकांचा दरही २५ हजारांपासून काही लाखांपर्यंत असताे.
कशी ओळखाल बाेगस संस्था?
- ज्या संस्था पैसे घेऊन त्वरित पदवी देण्याचा दावा करतात किंवा पदव्या देतात, त्या १०० टक्के बाेगस असतात.
- ज्या संस्था अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटी), विद्यापीठ अनुदान आयाेग (यूजीसी) यांच्याकडे नाेंद नसते. (या दाेन्ही परिषदांनी त्यांच्या अखत्यारित असलेल्या संस्थांची यादी जाहीर केलेली असते. त्यांच्या यादीत नसलेल्या संस्था बाेगस असतात.)
- यूजीसी हे उच्च शिक्षणातील पदवी देते, तर एआयसीटी हे तंत्रशिक्षणातील पदवी बहाल करते. त्यांच्याकडे नाेंद नसलेल्या मात्र, संबंधित पदव्या देणाऱ्या संस्था बाेगस असतात.
आराेग्याप्रमाणे शिक्षणातही बाेगस डाॅक्टर!
वैद्यकीय शिक्षण न घेता काही बाेगस डाॅक्टर रुग्णांवर उपचार करण्याची प्रॅक्टिस करतात. शिक्षण विभागातही संशाेधनाद्वारे डाॅक्टरेट ही पदवी मिळते. परंतु काही जणांनी हजाराे रुपये भरून बाेगस पीएच. डी. मिळवत स्वत:च्या नावापुढे डाॅक्टरेट लावत आहेत.
चाैकशी करून संबंधित दाेषी संस्थांवर कारवाई करणार
''बाेगस पदव्या देणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत उच्च शिक्षण संचालनालयाने याआधीच परिपत्रके काढली आहेत. पैसे घेऊन पदव्या विक्री करणाऱ्या संस्था माहीत असतील तर संबंधित विद्यार्थ्यांनी तत्काळ उच्च शिक्षण संचालनालयाच्या निदर्शनास आणून द्यावे. तसेच काेणत्याही संस्थेत प्रवेश घेताना त्या संस्थेची शासकीय ध्येयधाेरणानुसार मान्यता, कागदपत्रांची पडताळणी करावी. त्यांची पूर्ण माहिती घ्यावी. जाहिरातीला बळी पडू नये. आमच्याकडे तक्रार आल्यास त्याची चाैकशी करून संबंधित दाेषी संस्थांवर कारवाई करण्यात येईल असे उच्च शिक्षण संचालक डाॅ. धनराज माने यांनी सांगितले. ''