पॅकेज द्या नाहीतर रोजगार सुरू ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:09 AM2021-04-06T04:09:20+5:302021-04-06T04:09:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : काम करतो आणि कुटुंब जगवतो, सगळे नियमही पाळतो. तरीही आमचा रोजगार काढून घेता तर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : काम करतो आणि कुटुंब जगवतो, सगळे नियमही पाळतो. तरीही आमचा रोजगार काढून घेता तर मग आम्हाला पॅकेज द्या व ते जमत नसेल तर रोजगार सुरू ठेवा, अशी मागणी महाराष्ट्र हॉटेल्स अँन्ड फूड वर्कर्स युनियनने केली आहे.
कोरोना प्रादुर्भाव थांबवायचा म्हणून हॉटेल व रेस्टॉरंट बंद ठेवण्याचा महापालिका आयुक्तांचा निर्णय अयोग्य आहे. त्यामुळे मागील टाळेबंदीनंतर नुकतीच कुठे सुरू झालेली हॉटल उद्योगाची गाडी पुन्हा रूळांवरून खाली आली व त्याला रेस्टॉरंट, हॉटेल सायंकाळी ६ नंतर बंद ठेवण्याचा निर्णय घेणारे तुघलकच जबाबदार असल्याची टीका युनियनने केली.
शहरातील खाद्यपदार्थांच्या अशा लहानमोठ्या आउटलेटवर काही लाख जण अवलंबून आहेत. त्यांच्या घरची भाजीभाकरी या कामातून मिळणाऱ्या पगारावरच होते. तोच बंद केला जात असेल तर त्यांना पर्यायी रोजगार देण्याची जबाबदारीही बंद जाहीर करणाऱ्यांचीच आहे, असे मत युनियनचे उपाध्यक्ष चेतन अगरवाल यांनी व्यक्त केले.
चौकट
युनियनने केल्या मागण्या
सरकारला पॅकेज देणे जमत नसेल तर हाॅटेल व्यवसाय पूर्णवेळ करण्यास परवानगी द्यावी, पार्सल सेवा वेळही वाढवून द्यावी, हाॅटेल कामगारांसाठी नियमित आरोग्य तपासणी विमा योजना, नोकरीची हमी, विविध सरकारी योजनांचा लाभ फूड इंडस्ट्रीतील कामगारांना मिळेल, अशी व्यवस्था तयार करावी, अशा मागण्या युनियनने केल्या.
कोट
आम्ही हौसेने नाही तर गरज म्हणून हे काम करतो. सरकारने हॉटेल व्यवसायास परवानगी देताना घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन हॉटेलमालक करतातच, तरीही बंदीची पहिली कुऱ्हाड आमच्यावरच का? हॉटेल बंद म्हणून काम बंद, काम बंद तर पगार बंद, मग आम्ही करायचे काय?
- हॉटेल कामगार