'शेंगदाणे द्या अन् तेल घेऊन जा',पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 06:23 PM2021-10-25T18:23:57+5:302021-10-25T18:24:25+5:30
स्वयंपाकाच्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत, त्यावर उपाय म्हणून कृषी महाविद्यालयाने तुमच्या तेलबिया घेऊन या व त्याचेच तेल घेऊन जा असा उपक्रम सुरू केला आहे
पुणे : स्वयंपाकाच्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत, त्यावर उपाय म्हणून कृषी महाविद्यालयाने तुमच्या तेलबिया घेऊन या व त्याचेच तेल घेऊन जा असा उपक्रम सुरू केला आहे. शेंगदाणे, सूर्यफूल व करडई यांचे तेल यातून काढून अल्प दरात काढून देण्यात येईल.
महाविद्यालयाचे सहायक अधिष्ठाता प्रा. डॉ. सुनील मासाळकर यांच्या कल्पनेतून हा उपक्रम आकाराला आला आहे. अ़डीच किलो शेंगदाण्यांपासून साधारण १ किलो तेल निघते. बाजारातून शेंगदाणा किंवा कोणतेही तेल आणले तर त्याच्या कच्च्या मालाच्या दर्जाचे अनेक प्रश्न असतात. काळे पडलेले, खराब शेंगदाणे वापरलेले असले, काही प्रक्रिया करून तेल स्वच्छ केलेले असले तर काहीही सांगता येत नाही. या सर्वच गोष्टी आरोग्याला धोकादायक आहे असे डॉ. मासाळकर यांनी सांगितले.
त्यावर उपाय म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात ग्राहकांनी त्यांचे शेंगदाणे किंवा सूर्यफूल अथवा करडईच्या बिया घेऊन यायच्या हव्या आहेत. त्यांना लगेचच त्यांच्यासमोरच त्यांच्या शेंगदाण्यांपासून, तेलबियांपासून तेल काढून मिळेल. त्यापासून निघणारी पेंड त्यांनी नेली नाही तर एका किलोसाठी १५ रूपये व पेंड नेली तर ३० रूपये असा दर आहे.
नागरिकांना शुद्ध व स्वस्त तेल मिळावे यासाठी म्हणून महाविद्यालयाचे चांगल्या हेतूने हा उपक्रम सुरू केला आहे. उसाच्या शुद्ध रसाचा महाविद्यालयाचा उपक्रम मागील अनेक वर्ष नागरिकांच्या प्रतिसादाने दरवर्षी चांगला चालतो. तेल काढून देण्याच्या उपक्रमालाही तसाच प्रतिसाद मिळेल असा विश्वास डॉ. मासाळकर यांनी व्यक्त केला. महाविद्यालयाच्या शेतजमिनीत भूईमूग, सूर्यफूल व करडई यांची लागवड करून पुढे याला मोठे स्वरूप देण्याचा विचार आहे असे त्यांनी सांगितले.