सहा महिन्यांचा अवधी द्या
By admin | Published: February 10, 2015 01:32 AM2015-02-10T01:32:34+5:302015-02-10T01:32:34+5:30
शहरातील कचराप्रश्नावर सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी मार्ग काढला जात आहे. ८ आॅक्टोबरनंतर उरुळी कांचन येथे कचरा टाकला जाणार नाही
पुणे : शहरातील कचराप्रश्नावर सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी मार्ग काढला जात आहे. ८ आॅक्टोबरनंतर उरुळी कांचन येथे कचरा टाकला जाणार नाही, असे आश्वासन खासदार अनिल शिरोळे यांनी आज येथे दिले.
भाजपच्या सदस्यत्व नोंदणी अभियानाची माहिती सांगण्यासाठी आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार भीमराव तापकीर, मेधा कुलकर्णी आदी उपस्थित होते. मोबाईलवरील एसएमएसद्वारे आजवर १ लाख ४३ हजार सदस्य नोंदणी झाली असून, ५ लाख सदस्यांची नोंदणी करण्याचे शहर भाजपचे उद्दिष्ट आहे. ११ फेब्रुवारीस दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त २५५४ बूथवर सदस्य नोंदणीचे अभियान राबविले जाईल, असे शिरोळे यांनी नमूद केले.
शहरात कचरा जाळला जात असल्याने प्रश्न निर्माण झाले आहेत, असे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर शिरोळे म्हणाले, की कचऱ्याबाबत गेल्या २५ वर्षांत नियोजन झाले नाही. कोथरूडचा कचरा डेपो तेथील नागरिकांच्या विरोधामुळे बंद केला गेला आणि उरुळी कांचनला नेऊन टाकला जाऊ लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस पुणेकरच आहेत.
पुण्याच्या सर्व प्रश्नांबाबत त्यांना पुणेकरांइतकीच आस्था आहे. म्हणूनच त्यांनी ८ जानेवारी रोजी या प्रश्नावर बैठक घेतली. उरुळी कांचनचे ग्रामस्थही हजर होते. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी ८ आॅक्टोबरपर्यंत त्यांनी मुदत मागितली आहे.
सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी हा प्रश्न सोडविला जाईल. ८ आॅक्टोबरनंतर तेथे कचरा टाकला जाणार नाही, असा मी शब्द देतो. (प्रतिनिधी)