संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून लसीकरणाला प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:08 AM2021-07-19T04:08:31+5:302021-07-19T04:08:31+5:30

मंचर : राज्यात वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी तसेच तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून नागरिकांना लसीकरण करून घेणे ...

Give priority to vaccination, assuming a possible third wave | संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून लसीकरणाला प्राधान्य द्या

संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून लसीकरणाला प्राधान्य द्या

Next

मंचर : राज्यात वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी तसेच तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून नागरिकांना लसीकरण करून घेणे हाच सध्या पर्याय उपलब्ध आहे. त्यासाठी प्रशासनाने अलर्ट अथवा हाय अलर्ट गावात जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करावे, अशी सूचना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंचर येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली आहे.

मंचर येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामगृहात आयोजित शासकीय आढावा बैठकीत वळसे-पाटील बोलत होते. यावेळी शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, विष्णू काका हिंगे, सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, प्रांत सारंग कोडलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अंबादास देवमाने व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

वळसे पाटील म्हणाले की, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असून नागरिकांनीसुद्धा प्रशासनाला साथ दिली पाहिजे. सध्या लग्न समारंभ, गंध, दशक्रिया, अंत्यविधी यासारख्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना आढळून येत आहे. पोलीस प्रशासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष करता कामा नये. प्रत्येक गावातील मतदारयादीनुसार प्रत्येक घरातील एका नागरिकाची टेस्ट करून घेणे गरजेचे आहे. जर एखाद्या घरात एक नागरिक पॉझिटिव्ह आढळला तर इतर कुटुंबाचे टेस्ट करावी जेणेकरून प्रत्येक कुटुंबाची टेस्ट केल्यानंतर कोरोना कमी करण्यास मदत होईल.

कोरोनावर नियंत्रण मिळवत असतानाच आंबेगाव तहसील कार्यालयाकडून नागरिकांच्या इतर कामाची दखल घेण्यासाठी तहसीलदार कार्यालयात उपलब्ध होत नसल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी आपल्या कार्यालयात बसून कोरोनासंदर्भात काम करता करता नागरिकांच्या कामाचीही दखल घेण्याचे आदेश दिले आहेत.

पारगाव येथे राज्य सरकारने नुकतेच पोलीस ठाण्याला मान्यता दिली आहे. त्यासंदर्भात जागेची पाहणी करण्याचे तातडीने आदेश पोलीस अधीक्षक यांना दिले आहेत.

१८ मंचर

मंचर येथील विश्रामगृहातील बैठकीत बोलताना दिलीप वळसे-पाटील.

Web Title: Give priority to vaccination, assuming a possible third wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.