विद्यार्थ्यांच्या संशोधन दृष्टीला वाव द्यावा
By admin | Published: January 11, 2017 03:45 AM2017-01-11T03:45:07+5:302017-01-11T03:45:07+5:30
विद्यार्थ्यांच्या कल्पनांना व नवनिर्मितीला व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने आविष्कारसारख्या स्पर्धा महत्त्वाच्या आहेत. स्पर्धा जिंकणे हा विद्यापीठाचा उद्देश असला
पुणे : विद्यार्थ्यांच्या कल्पनांना व नवनिर्मितीला व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने आविष्कारसारख्या स्पर्धा महत्त्वाच्या आहेत. स्पर्धा जिंकणे हा विद्यापीठाचा उद्देश असला, तरीही विद्यार्थ्यांच्या संशोधन दृष्टीला वाव मिळणे गरजेचे आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी मंगळवारी व्यक्त केले.
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धा नुकुतीच पार पडली. त्यातून निवड झालेल्या स्पर्धकांसाठी आयोजित केलेल्या विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. गाडे बोलत होते. या प्रसंगी महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड, आविष्कार स्पर्धेचे समन्वयक डॉ. रवींद्र जायभाये, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई आदी उपस्थित होते.
मोहन खोंड म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांची कार्यक्षमता वाढत चालली असून पर्यावरण, कचरा व्यवस्थापन, ऊर्जानिर्मिती तसेच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रोगांचे निदान शोधण्याबाबतचे प्रकल्प विद्यार्थी सादर करीत आहेत.’’
४८ प्रकल्पांची होणार निवड
४राज्यातील विद्यापीठांमधील व महाविद्यालयांंमधील विद्यार्थी व प्राध्यापकांनी नावीन्यपूर्ण संशोधन प्रकल्प तयार करावेत, तसेच संशोधन क्षेत्रात योगदान द्यावे, या हेतूने आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
४यंदा राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धा येत्या २७ ते २९ जानेवारी या कालावधीत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ४८ विद्यार्थ्यांचे प्रकल्प निवडले जाणार आहेत. मंगळवारी इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, अॅग्रिकल्चर, मेडिकल- फार्मसी या विद्याशाखांतील विद्यार्थ्यांचे प्रकल्प स्पर्धेत सादर करण्यात आले.