सहा लाख द्या, आर्मीत नोकरी देतो! ४२ मुलांना १.८० कोटींचा गंडा, भामट्याला पकडले
By नितीश गोवंडे | Published: October 14, 2023 03:46 PM2023-10-14T15:46:45+5:302023-10-14T15:47:20+5:30
फेब्रुवारी २०२२ ते १५ सप्टेंबर २०२३ पर्यंतच्या काळात हा प्रकार घडला.
पुणे : टेरिटोरिअल आर्मीमध्ये भरती करण्याचे आमिष दाखवून ४२ मुलांची १ कोटी ८० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार सदर्न कमांडच्या लायझन युनिटने उघडकीस आणला आहे. आरोपीला तासगाव येथून अटक करीत गुन्हा दाखल केला आहे. पांडुरंग कराळे (४५, रा. स्टेशन रोड, गजानननगर, पाटील मळा, तासगाव, जि. सांगली) असे आरोपीचे नाव आहे. फेब्रुवारी २०२२ ते १५ सप्टेंबर २०२३ पर्यंतच्या काळात हा प्रकार घडला.
महेश पंढरीनाथ ढाके (३५, रा. पाटण) यांनी फिर्याद दिली आहे. ढाके हे फेब्रुवारी २०२२ रोजी कामानिमित्त पुण्यात आले होते. त्यावेळी कोंढवा परिसरातील एका हॉटेलमध्ये ते बसले होते. शेजारी असलेल्या टेबलवर लष्करात आम्ही भरती करतो, असे एक जण बोलत होता. हे ऐकून ढाके त्यांच्याकडे गेले. लष्करातील मोठे अधिकारी चांगले ओळखीचे आहेत. तुमचे कोण नातेवाईक असतील, तर सांगा, असे म्हणून स्वत:चे नाव पांडुरंग कराळे सांगितले आणि स्वत:चा मोबाइल क्रमांक ढाके यांना दिला.
ढाके यांनी ही बाब त्यांच्या मित्राला सांगितली. तेव्हा मित्राने स्वत:च्या मुलासाठी कराळेला विचार, असे सांगितले. त्यावर कराळेने एका उमेदवारासाठी ६ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. यानंतर ढाके यांच्या मित्राच्या मुलाने त्याच्या मित्रांनादेखील याबाबत सांगितले. असे करत-करत ४२ उमेदवार ढाकेंनी तयार केले. या उमेदवारांकडून एकूण १ कोटी ८० लाख रुपये ढाकेंनी घेत पांडुरंग कराळेला दिले. यानंतर ढाकेंनी कराळे सांगेल त्यावेळी टप्प्याटप्प्याने मुलांना आद्रकी टोलनाका, बेळगाव येथे घेऊन गेले. ४२ मुलांची खोटी वैद्यकीय तपासणी केली. लेखी परीक्षेसंदर्भात मुलांची बनावट हॉल तिकिटे पाठवली. मात्र, दर वेळी परीक्षेची तारीख पुढे ढकलल्याचे सांगायला लागला. त्यानंतर ढाके यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. लोकांची फसवणूक होत असल्याची कुणकुण सदर्न कमांडच्या लायझन युनिटला लागली होती. त्यांनी पांडुरंग कराळेचा शोध घेऊन, त्याच्यावर पाळत ठेवली. एक डमी उमेदवार त्यात घुसवून कराळे सांगेल ती प्रक्रिया पार पाडली. त्यानंतर गुरुवारी कराळेला त्याच्या घरातून पोलिसांमार्फत ताब्यात घेण्यात आले.