धान्य शिल्लक साठ्यातून सामाजिक संस्थांना द्या!
By admin | Published: January 26, 2016 01:47 AM2016-01-26T01:47:10+5:302016-01-26T01:47:10+5:30
जिल्ह्यातील २३ सामाजिक संस्थांना शासनाकडून कल्याणकारी योजनेत देण्यात येणारे धान्य आॅक्टोबर महिन्यापासून बंद करण्यात आल्याने अनेक बालाश्रम,
पुणे : जिल्ह्यातील २३ सामाजिक संस्थांना शासनाकडून कल्याणकारी योजनेत देण्यात येणारे धान्य आॅक्टोबर महिन्यापासून बंद करण्यात आल्याने अनेक बालाश्रम, वृद्धाश्रम व वसतिगृहातील मुलांवर उपासमारीची वेळ आली होती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच या वृत्ताची दखल घेऊन शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन तातडीने सर्व संस्थांना शिल्लक धान्यसाठ्यातून पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत शहर अन्नधान्य पुरवठा अधिकारी नीलिमा धायगुडे यांनी सांगितले की, कल्याणकारी योजनेत धान्यपुरवठा करण्यात येणाऱ्या संस्थांना बुधवारपासून धान्यवाटप करण्यात येणार आहे. शासनाच्या वतीने कल्याणकारी योजनेंतंर्गत शहर आणि जिल्ह्यातील सामाजिक संस्था, वसतिगृहे, वृद्धाश्रम, कारागृह, बालाश्रम, आश्रमशाळांना दर महिन्याला रेशनिंगवर मिळणारे धान्य उपलब्ध करून दिले जाते. पुरवठा विभागाच्या वतीने धान्याची मागणी असणाऱ्या संस्थांना रेशनकार्डप्रमाणे स्वतंत्र ‘आस्थापना कार्ड’ उपलब्ध करून दिले जाते. हे धान्य रेशनिंगवर मिळणाऱ्या दरामध्येच म्हणजे २ रुपये किलो गहू आणि ३ रुपये किलो तांदूळ या दराने उपलब्ध करून दिले जाते. यासाठी शासनाकडून प्रत्येक जिल्ह्याकडे कल्याणकारी योजनेंतर्गत किती धान्याची मागणी आहे याचा प्रस्ताव मागविला जातो. त्यानंतर राज्य शासन हा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवते आणि केंद्राकडून मागणीप्रमाणे धान्य उपलब्ध करून दिले जाते. परंतु राज्य शासनाने आॅक्टोबर महिन्यापासून असा प्रस्तावच केंद्राकडे पाठविलेला नसल्याने धान्य उपलब्ध करून दिलेले नाही. यामुळे शहरातील २३ संस्थांना आॅक्टोबर महिन्यापासून हे स्वस्त धान्यच मिळालेले नाही. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच शासनाने केंद्र शासनाकडून धान्य येण्याची वाट न पाहता शिल्लक असलेल्या धान्यसाठ्यातून या संस्थांना धान्यपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत.