आठवडेबाजारासाठी पुण्यात जागा द्या
By admin | Published: March 17, 2017 02:10 AM2017-03-17T02:10:47+5:302017-03-17T02:10:47+5:30
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना ताजा शेतमाल आठवडेबाजाराच्या माध्यमातून ग्राहकांना थेट विकता यावा, यासाठी मोठ्या गृहरचना संस्थांनी जागा उपलब्ध करून दिल्या
पुणे : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना ताजा शेतमाल आठवडेबाजाराच्या माध्यमातून ग्राहकांना थेट विकता यावा, यासाठी मोठ्या गृहरचना संस्थांनी जागा उपलब्ध करून दिल्या, मैदाने उपलब्ध करून दिली तर शेतकऱ्यांना रास्त दाम मिळेल. या माध्यमातून एक तरी आत्महत्या रोखली जाईल, असे भावनिक आवाहन सहकार, पणन आणि वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी येथे केले.
पुणे पीपल्स को-आॅपरेटिव्ह बँकेतर्फे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांना पुणे पीपल्स पुरस्कार देऊन देशमुख यांच्या हस्ते गौरविण्यात आले. फुले पद्धतीची पगडी, १ लाख १ हजार रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. गणेश कला, क्रीडा मंचामध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे होते. नियोजित महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक स्मिता वस्ते यांच्यासह बँकेचे अध्यक्ष सुभाष मोहिते, संचालक बबनराव भेगडे, विजयकांत कोठारी, जनार्दन रणदिवे आदी व्यासपीठावर होते. शीलाताई आढाव यांचाही गौरव या वेळी करण्यात आला.
डॉ. आढाव यांनी त्यांच्या भाषणात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न केले जावेत, हमालांना पत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती, त्यावर देशमुख म्हणाले, की देशातील ४८ कोटी
कष्टकऱ्यांचे अन्न, वस्त्र, निवाऱ्याचे स्वप्न साकारण्यासाठी सरकारकडून आपल्या परीने प्रयत्न केले जात आहेत. पुणेकरांनीही त्यामध्ये एक तरी काम केले पाहिजे. आठवडेबाजारासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास पुणेकरांनाही ताजा शेतमाल मिळून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना रास्त भाव मिळेल. मैदाने आठवडेबाजारासाठी दिल्यास एक जरी आत्महत्या रोखली गेली, तर त्याचे श्रेय पुणेकरांना मिळेल.
अशा बाजारांसाठी जागा देण्यासाठी पुणे महानगरपालिकेशी यापूर्वी संपर्क साधल्याची पुस्ती जोडून देशमुख यांनी सरकारी आणि खासगी रुग्णालयात ज्यांना जाता येत नाही, अशा गरजू रुग्णांसाठी पीपल्स बँकेने सहकार रुग्णालय उभारण्याचे प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
डॉ. देखणे यांनी डॉ. आढाव यांच्या रुपाने विचारतत्त्वांचा, सामाजिक विचारांचा गौरव होत असल्याची भावना व्यक्त केली. महाराष्ट्राला संत परंपरा, लोककला, सुधारक आणि पुरोगामित्वाची परंपरा असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रारंभी लघुचित्रफितीद्वारे डॉ. आढाव यांच्या कार्याची माहिती देण्यात आली. पीपल्स बँकेने अवयवदानाची मोहीम सुरू केल्याची माहिती सुभाष मोहिते यांनी प्रास्तविकात सांगितली. (प्रतिनिधी)