विद्यार्थ्यांना शुल्क भरण्याची सवलत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:11 AM2021-05-07T04:11:05+5:302021-05-07T04:11:05+5:30
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना तीन ते चार टप्प्यांमध्ये शुल्क भरण्यास मुदत ...
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना तीन ते चार टप्प्यांमध्ये शुल्क भरण्यास मुदत द्यावी. तसेच नियम डावलून प्राध्यापकांना सेवेतून कमी करू नये. त्याचप्रमाणे प्राध्यापकांचे वेतन दर महिन्याला वेळेत द्यावे, अशा सूचना ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनतर्फे दिले आहेत.
कोरोनामुळे अनेकांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांचे पूर्ण वर्षाचे शुल्क एकदाच भरणे अडचणीचे होत आहे. मात्र, काही शैक्षणिक संस्थांकडून पूर्ण शुल्क भरण्याची सक्ती केली जात आहे. तसेच प्राध्यापकांना कामावरून कमी केले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. याबाबत एआयसीटीईकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे एआयसीटीईने यासंदर्भात परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
विद्यार्थ्यांना शुल्क भरण्याबाबत सवलत दिली आहे, असे परिपत्रक सर्व शैक्षणिक संस्थांनी आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे. तसेच सर्व विद्यार्थ्यांना ई-मेलद्वारे ही माहिती कळवावी. त्याचप्रमाणे प्राध्यापकांना कामावरून कमी करू नये, असे एआयसीटीने परिपत्रकात नमूद केले आहे.