आधी अकरा गावांसाठी दोन हजार कोटी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:13 AM2021-02-11T04:13:08+5:302021-02-11T04:13:08+5:30
पुणे : महापालिकेच्या हद्दीमध्ये नव्याने समाविष्ट होणाऱ्या २३ गावांसाठी पालिकेने नऊ हजार कोटींची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. परंतु, ...
पुणे : महापालिकेच्या हद्दीमध्ये नव्याने समाविष्ट होणाऱ्या २३ गावांसाठी पालिकेने नऊ हजार कोटींची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. परंतु, पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी यापूर्वी समाविष्ट झालेल्या ११ गावांसाठी दोन हजार कोटींची तरतूद अंदाजपत्रकात करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश ढोरे यांनी महापौर आणि आयुक्तांकडे केली आहे. नव्याने येणाऱ्या गावांच्या नावाखाली आधीच्या गावांवर अन्याय करू नका, असेही ढोरे यांनी नमूद केले.
भाजपाच्याच सत्ताकाळात पालिकेच्या हद्दीमध्ये २०१७ साली समाविष्ट झालेल्या अकरा गावांमध्ये अद्यापही पुरेशी विकासकामे झालेली नाही. या गावांच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले असून विकासासाठीचा निधी वर्गीकरणाद्वारे भाजप नगरसेवकांनी पळवला. २३ गावांसाठी भाजपने राज्य सरकारकडे ९ हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. यापूर्वी समाविष्ट झालेल्या ११ गावांसाठी तत्कालीन भाजप सरकारकडे पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी किती निधी मागितला होता, त्यापैकी किती निधी मिळाला याचे उत्तर द्यावे, असेही ढोरे म्हणाले.