राज्यसभेची आम्हाला किमान एक तरी जागा द्याच; पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

By राजू इनामदार | Published: January 31, 2024 04:18 PM2024-01-31T16:18:45+5:302024-01-31T16:19:52+5:30

राज्यसभेच्या राज्यातील ६ रिक्त जागांपैकी तब्बल ५ जागा भाजपला मिळणार आहेत....

Give us at least one Rajya Sabha seat; Demand of BJP officials in Pune | राज्यसभेची आम्हाला किमान एक तरी जागा द्याच; पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

राज्यसभेची आम्हाला किमान एक तरी जागा द्याच; पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

पुणे : पक्षाला महापालिकेत कधी मिळाली नव्हती ती एकहाती सत्ता मिळाली, एकाचवेळी सर्व विधानसभा मतदारसंघात विजय मिळवून दिला, त्यामुळे राज्यसभेच्या ६ रिक्त जागांपैकी किमान एक जागा तरी पुणे शहराला द्यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून पक्षश्रेष्ठींकडे करण्यात येत आहे.

राज्यसभेच्या राज्यातील ६ रिक्त जागांपैकी तब्बल ५ जागा भाजपला मिळणार आहेत. विधानसभेतील आमदार या निवडणुकीसाठी मतदार असतात. फक्त भाजपच्याच आमदारांची संख्या १०४ आहे. त्याशिवाय महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिवसेना (शिंदे गट) यांचेही आमदार भाजपकडेच आहे. या दोन गटांना प्रत्येकी एक जागा दिली तरीही भाजपकडे ३ जागा राहतात. त्यातील एक जागा पुण्याला द्यावी अशी पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. सध्या पुण्याचे दिल्लीतील लोकनियुक्त प्रतिनिधित्व खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त आहे. त्यातच राज्यसभेतही कोणी नसल्यास पुण्याचे दिल्लीत कोणीच नाही अशी स्थिती होईल.

माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर पुण्याचे आहेत. ते राज्यसभेचे सदस्य होते. त्यांची जागा रिक्त होत आहे. त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच एका जागेवर आमचा राजकीय हक्कच आहे असे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुणे शहराने मागील काही वर्षात प्रत्येक निवडणूकीत भाजपला साथ दिली आहे. एकाचवेळी खासदार, आमदार व महापालिकेतील नगरसेवक अशी सत्ता भाजपकडे होती. आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही. पुणेकरांनी इतके भरभरून मतदान केले असताना त्यांना डावलणे राजकीय दृष्ट्या योग्य होणार नाही असेही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पुणे राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. राज्यसभेत पुण्याचा किमान एक सदस्य असणे योग्य आहे. पक्षासाठीही ते चांगले होईल. त्यामुळे उमेदवार कोण ते पक्षाने ठरवावे, मात्र ६ रिक्त जागांपैकी किमान १ जागा पुणे शहराला द्यावी असे मत भाजपचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत. मात्र लोकसभेची उमेदवारी पुण्यातून मिळावी यासाठीही ते प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. राज्यसभेची जागा पुण्याला द्यायची की नाही याचा निर्णय केंद्रीय स्तरातूनच होणार असल्याने तिथेच जोर लावण्यात येत असल्याची चर्चा आहे.

राज्यसभेत प्रतिनिधित्व असणे ही त्यात्या शहरासाठी गौरवाची गोष्ट असते. पुण्याला हा मान मिळावा या पदाधिकाऱ्यांच्या मतामध्ये काहीच गैर नाही. या जागांचा निर्णय पक्षाचे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड घेत असते. उमेदवार ठरवण्याचा अधिकारही त्यांचाच असतो. त्यांच्यापर्यंत आम्ही ही मागणी पोहचवू. मागणी योग्य आहे असेच माझेही मत आहे.

- धीरज घाटे- शहराध्यक्ष, भाजप, पुणे

Web Title: Give us at least one Rajya Sabha seat; Demand of BJP officials in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.