आम्हाला हारतुरे, मानसन्मान नकोत, स्वच्छ शौचालये द्या! (महिला दिन)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:11 AM2021-03-08T04:11:50+5:302021-03-08T04:11:50+5:30
पुणे : ना पाणी ना कचरापेटीची सुविधा. सँनिटरी पॅड टाकायचीसुद्धा साधी व्यवस्था नसल्याने ते खिडकीत ठेवणे किंवा शौचालयातच टाकून ...
पुणे : ना पाणी ना कचरापेटीची सुविधा. सँनिटरी पॅड टाकायचीसुद्धा साधी व्यवस्था नसल्याने ते खिडकीत ठेवणे किंवा शौचालयातच टाकून फ्लश करण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार महिलांकडून होताना दिसतात. त्यात भर म्हणून अस्वच्छ्ता आणि दुर्गंधी आहेच! वर्षानुवर्षे महिलांसाठीच्या सार्वजनिक शौचालयांचे हे चित्र अद्यापही बदलले नाही. याविरूद्ध आवाज उठवला की तेवढ्यापुरती पावले उचलली जातात पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ शौचालये महिलांसाठी उपलब्ध होणे ही गरज असतानाही त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे...हीच स्थिती थोड्याफार प्रमाणात शासकीय कार्यालयांसह न्यायालयातील शौचालयांची देखील आहे.
उद्या (दि. ८) महिला दिन सर्वत्र साजरा होणार आहे. पण या दिवशी आम्हाला हारतुरे नकोत किंवा सत्कार-सन्मान देखील नकोत...आम्हाला हवंय स्वच्छ शौचालय या मागणीसाठी महिलांनीच ’आरोग्यदायी व स्वच्छ शौचालय’ ही देशव्यापी चळवळ’ सुरू केली आहे. या चळवळीच्या माध्यमातून याचिका दाखल करण्यासाठी समाजातून आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर आॅनलाईन स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे.
विविध शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्येही शौचालयांची अवस्था म्हणावी तितकी चांगली नाही. परिणामी, त्यांच्या वापराने आजाराची भीती आहे. त्यामुळे महिलांची कुचंबणा होते. जंतुसंसर्गाने आजार होतील या भीतीने गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक शहरांमध्ये महिला सार्वजनिक शौचालयांमध्ये जाण्याचेच टाळतात. स्वच्छतागृहांच्या प्रवेशद्वारावर कचरा साचलेला असतो. फरशा फुटलेल्या असतात. नळ तुटके असतात...अनेक ठिकाणी पाणी नसते. अनेक शहरे, महानगरे आणि मेट्रोपोलिटन सिटी मध्ये सुद्धा स्वच्छतागृहे या विषयावर कमालीची अनास्था आहे. या अनास्थेच्या मागे बेशिस्त समाज आणि संवेदनाहीन प्रशासन हे दोन्ही घटक कारणीभूत आहेत. महिलांना विशेषत: मासिक पाळीच्या काळामध्ये सॅनिटरी पॅड, कापड बदलण्यासाठी स्वच्छ शौचालये उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे. याकरिता ’आरोग्यदायी व स्वच्छ शौचालय’ ही चळवळ सुरू करण्यात आली असल्याची माहिती चळवळीच्या संयोजक अरूणा पुरोहित यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
-----------------------------
’खासदारांपासून ग्रामपंचायत सदस्यांपर्यंत सर्व स्तरातील लोकप्रतिनिधींनी आपापल्या क्षेत्रात महिला स्वच्छतागृहांची उभारणी, दुरुस्ती, देखभाल आणि व्यवस्थापन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कालबध्द मोहिमा राबविल्या पाहिजेत अन्यथा ही देशव्यापी चळवळ संघर्षाचा पावित्रासुध्दा घेऊ शकते- अरूणा पुरोहित, संयोजक
-----------------------
विधानसभेत उठवला प्रश्न
8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा होत आहे. विधासभेच्या अधिवेशनाला आम्ही 22 महिला आमदार आलेल्या आहोत. या इमारतीत आम्हाला जे स्वच्छतागृह वापरण्यास दिले आहे. त्याच्या फर्निचरला शेवाळं लागलं आहे. बाथरूमची अवस्था अत्यंत वाईट आहे. कित्येक वर्षे विधानसभेच्या वीस मजली इमारतीत आम्हाला साठ ते सत्तर फूटांपेक्षा अधिक मोठी जागा मिळू शकत नाही. ही दुर्दैवी बाब आहे. सर्व महिला आमदारांना चांगले स्वच्छ्तागृह उपलब्ध करून द्यावे अशा शब्दातं पुण्याच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठविला.
-----------
पुणे शहरामध्ये महिलांना सहज आणि स्वच्छ स्वच्छतागृहे मिळावीत यासाठी महापालिकेच्या वतीने खूप प्रयत्न करण्यात आले. परंतु आजही महापालिकेकडे महिलांची स्वच्छतागृहे बांधण्याऐवजी अस्तित्वात असलेली स्वच्छतागृहे पाडण्यासाठीच नगरसेवक अधिक अर्ज देतात. प्रशासन, समाजाच्या पातळीवर याबाबत अधिक जनजागृती होऊन सकारात्मक विचार करण्याची गरज आहे.
- राजश्री नवले, माजी महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष
------------------------------
लोकसंख्येच्या तुलनेत स्वच्छतागृह कमी
पुण्यात एकूण १३८१ सार्वजनिक स्वच्छतागृहे असून, त्यात झोपडपट्ट्यांमध्ये ८६१, सार्वजनिक ठिकाणी ३६३ स्वच्छतागृहे आणि १५७ मुताऱ्यांचा समावेश आहे. ही संख्या शहराच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत नगण्य असून, त्यात महिलांसाठी बांधलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या खूपच कमी आहे.
--------------------------