Republican Party Of India: आम्हाला जागा द्या, अन्यथा तुमचा प्रचार करणार नाही, RPI चा भाजपला कडक शब्दात इशारा
By राजू इनामदार | Published: October 14, 2024 03:09 PM2024-10-14T15:09:43+5:302024-10-14T15:13:32+5:30
आम्ही विधानसभेसाठी १२ जागा मागत आहोत, पण त्याबाबत महायुती एकही शब्द बोलत नाही, आंबेडकरी जनता महायुतीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही
पुणे: आमचे नेते विधानसभेच्या १२ जागा मागत आहेत, त्यावर तूम्ही एक शब्दही बोलायला तयार नाही, आंबेडकरी जनतेची मते तूम्हाला हवीत, पण तळातील कार्यकर्ते वंचितच ठेवायचे आहेत, त्यामुळे आता जागा नाहीत तर मग तूमचा प्रचारही नाही अशा कडक शब्दांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाच्या वतीने महायुतीला इशारा देण्यात आला.
भारतीय जनता पक्षाने आरपीआय बरोबर युती तर केली आहे, मात्र सत्तेतील वाटा देण्याबाबत आंबेडकरी जनतेला कायम झुलवतच ठेवले आहे, असा थेट आरोप यावेळी करण्यात आला. महायुतीतील अन्य दोन पक्षही असेच असल्याची टीका करण्यात आली. मते हवीत तर मग विधानसभेच्या किती जागा देणार ते सांगा, अन्यथा यावेळी आंबेडकरी जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी गर्भित धमकीच कार्यकर्त्यांनी दिली.
पक्षाचे राज्य सचिव परशूराम वाडेकर यांनी सांगितले की, पक्षाच्या पुण्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची ही बैठक उत्स्फूर्त आहे. भाजप आणि महायुतीच्या फसवेगिरीला कार्यकर्ते आता कंटाळले आहेत. पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले मागील कितीतरी दिवसांपासून पक्षासाठी विधानसभेच्या १२ जागा मागत आहेत. मात्र आमची ज्यांच्याबरोबर युती आहे तो भाजप किंवा युतीतील शिवसेना (एकनाथ शिंदे) वराष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)यावर एक चकार शब्द बोलत नाहीत. जागा वाटपाच्या चर्चैतही आठवले यांना कधीच बरोबर घेतले झात नाहीत. याचा सरळ अर्थ ते आम्हाला ग्रुहित धरून आहेत असाच होतो.
आंबेडकर विचारांना विरोध असलेल्या पक्षाबरोबर युती करण्याचे राजकीय धाडस आठवले यांनी दाखवले, ते आंबेडकरी जनतेला सामाजिक आर्थिक राजकीय फायदा मिळावा म्हणून, प्रत्यक्षात मात्र भाजपला, महायुतीला राजकीय फायदा व आंबेडकरी जनता मात्र उपेक्षित अशी स्थिती आहे. लोकसभेलाही एकही जागा दिली नाही. आता विधानसभेलाही तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सुरू आहे. आरपीआय कार्यकर्ता हे सहन करणार नाही असे वाडेकर म्हणाले. पुण्यातील कँन्टोन्मेट तसेच राज्यातील अन्य ११ विधानसभा मतदार संघ आरपीआय साठी सोडावेत, अन्यथा या विधानसभा निवडणूकीत महायुतीच्या प्रचारासाठी एकही कार्यकर्ता बाहेर पडणार नाही असे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य नेत्यांना पाठवले असल्याची माहिती वाडेकर यांनी दिली.
पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांनी १२ जागांची भूमिका जाहीर केली आहे. आम्हाला ते मान्य आहे. तीच मागणी आम्ही करत आहोत. आठवले यांची लवकरच भेट घेऊन त्यांना कार्यकर्त्यांच्या भावना सांगणार आहे.- परशूराम वाडेकर, महासचिव. आरपीआय, (आठवले गट)