लस तर विनामूल्य द्याच, पण धान्यपुरवठाही करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:10 AM2021-05-25T04:10:44+5:302021-05-25T04:10:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: स्वाभिमानाने करत असलेला रोजगार बंद झाला. नैसर्गिक आपत्ती म्हणून वर्षभर शिलकीत दिवस काढले, आता ती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: स्वाभिमानाने करत असलेला रोजगार बंद झाला. नैसर्गिक आपत्ती म्हणून वर्षभर शिलकीत दिवस काढले, आता ती शिलकी पण संपली, आता सरकार हाच आसरा आहे, त्यामुळे लसीबरोबरच जगण्यासाठी अन्नधान्याचाही पुरवठा सरकारने करावा, अशी मागणी अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव व निमंत्रक नितीन पवार यांनी केली आहे.
सन १९७२ च्या दुष्काळात तत्कालीन सरकारने ही जबाबदारी ओळखून जनता जगवली होती. त्याही आधी ब्रिटिशांनीसुद्धा अशा संकटात जनतेला कधी वाऱ्यावर सोडलेले नाही, त्यामुळे आताही सरकारवर तीच जबाबदारी आहे, ती सोडून सरकार खासगी रुग्णालयांंना लशींचा पुरवठा करत असेल तर ते कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेच्या विरोधात आहे, असे मत डॉ. आढाव यांनी व्यक्त केले.
गेल्या संपूर्ण वर्षभरात कष्टकरी जनतेचा रोजगारच बंद आहे. त्यात बुटपॉलिश करून पोट भरणारे ते रोज वडापावची विक्री करून घर चालवणारे अशा अनेकांचा समावेश आहे. हे सगळे लोक कष्ट करून स्वाभिमानाने पोट भरत होते. व्यवसाय बंद झाला तरी त्यांनी हिमतीने शिलकीवर घर चालवले. आता मात्र त्यांच्याजवळ काहीच शिल्लक नसून सरकारनेच त्यांना जगवण्याची जबाबदारी घ्यायला हवी.
त्यानुसार सरकारने आता या सर्वांच्या विनामूल्य लसीकरणाची व्यवस्था करावी, त्यांना रेशनिंगवर धान्याबरोबरच तेल, तूप, डाळी, मसाले या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू करावा, कष्टकऱ्यांची ही मागणी सरकारने विनाविलंब मान्य करावी, अन्यथा कष्टकरी जनतेला बरोबर घेऊन लोकप्रतिनिधी, वरिष्ठ सरकारी अधिकारी यांच्या दारात धरणे धरण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल, असा इशारा डॉ. आढाव व निमंत्रक पवार यांनी दिला आहे.