उरुळी देवाची व फुरसुंगी यांच्यानंतर वाघोलीला स्वतंत्र नगरपालिका द्या; ग्रामस्थांची एकनाथ शिंदेंकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 03:57 PM2022-12-08T15:57:51+5:302022-12-08T16:01:38+5:30

महानगरपालिकेतून वगळून नवीन महानगरपालिका अथवा नगरपालिका हा पर्याय होऊ शकतो

Give Wagholi a separate municipality after Uruli Devachi and Fursungi Demand of villagers to Eknath Shinde | उरुळी देवाची व फुरसुंगी यांच्यानंतर वाघोलीला स्वतंत्र नगरपालिका द्या; ग्रामस्थांची एकनाथ शिंदेंकडे मागणी

उरुळी देवाची व फुरसुंगी यांच्यानंतर वाघोलीला स्वतंत्र नगरपालिका द्या; ग्रामस्थांची एकनाथ शिंदेंकडे मागणी

googlenewsNext

वाघोली : पुणे महापालिकेत समाविष्ट असलेली उरुळी देवाची व फुरसुंगी ही गावे पुन्हा महापालिकेतून वगळण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या दोन गावांची एकत्रित नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आता पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट असलेल्या वाघोली ग्रामस्थांकडूनदेखील वाघोली गाव वगळून स्वतंत्र नगरपालिका निर्माण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

पुणे महानगरपालिका हद्दीलगतच्या गावांचा पुणे महानगरपालिकेत समावेश झाला होता. यामध्ये उरुळी देवाची व फुरसुंगी यासह ११ गावांचा प्रथम समावेश झाला. त्यानंतर वाघोलीसह अन्य २३ गावांचा समावेश झाला. मात्र, महापालिकेच्या मिळकतकराला समाविष्ट गावांचा विरोध आहे. ग्रामपंचायतीच्या तुलनेत वाढीव दराने कर आकारणी होत असून त्या तुलनेत गावांना सोयी-सुविधा मिळत नसल्याची ओरड या गावांची आहे. यामुळे आता उरुळी देवाची व फुरसुंगीच्या धरतीवर वाघोलीची देखील स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासंदर्भात वाघोली ग्रामस्थांकडून उद्या संध्याकाळी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले आहे. त्यानंतर पुढील दिशा ठरणार आहे.

''वाघोली गाव पुणे महापालिकेत समावेश होऊन दीड वर्षे झाले आहेत. भौगोलिकदृष्ट्या विचार करता पुणे महापालिकेचे क्षेत्रफळ मोठे असून नियोजित विकास होणे अशक्य आहे. स्वतंत्र नगरपालिका झाल्यास वाघोली गावचा विकास मोठ्या प्रमाणात होईल. -शिवदास पवार, सामाजिक कार्यकर्ते''

''वाघोलीच्या लोकसंख्येचा विचार करता वाघोलीत नवीन नगरपालिका होणे गरजेचे आहे. महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर विकास न होता जास्त नुकसानच झाले. भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर वाघोली हे सर्वांत शेवटचे गाव आहे. त्यामुळे वाघोलीचा विकास होणे अवघड आहे. -राजेंद्र सातव पाटील, वाघोली ग्रामस्थ''

''वाघोली स्वतंत्र नगरपालिका स्थापना करण्यासंदर्भात वाघोली ग्रामस्थांना विचारात घेऊन योग्य तो निर्णय घेऊन शासकीय स्तरावर पाठपुरावा करू. -रामदास दाभाडे, वाघोली ग्रामस्थ.''

''उरुळी देवाची व फुरसुंगी या नवीन नगरपालिकेच्या धर्तीवर वाघोली नगरपालिका होण्यासंदर्भात वाघोली ग्रामस्थांचे मत आहे. त्यानुसार योग्य तो निर्णय होईल. -संजय सातव पाटील, वाघोली ग्रामस्थ.''

''महानगरपालिकेतून वगळून नवीन महानगरपालिका अथवा नगरपालिका हा पर्याय होऊ शकतो. ग्रामपंचायतसारखा कारभार नको. जनप्रतिनिधी हे फक्त नगरसेवक न ठेवता सर्व स्तरातून निवडले जावेत. -संजयकुमार पाटील, वाघोली सोसायटीधारक.''

''वाघोली हे पुणे महानगरपालिकामध्ये समाविष्ट होऊन १७ महिने झाले. मोठ्या प्रमाणात टॅक्स वसूल केला आहे. मात्र, विकास काहीच नाही. -संदीप सातव, भाजपा पदाधिकारी''

''महानगरपालिका असो या नगरपालिका सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. त्यामुळे समस्या सोडवणे हीच महत्त्वाची जबाबदारी आहे. -बाळासाहेब सातव (ज्येष्ठ नागरिक संघ)''

''वाघोलीसाठी स्वतंत्र महापालिकेची निर्मिती केली गेली, तर या क्षेत्राचा विकास होईल. नगरपालिकेचे नेतृत्व एका आयएएस अधिकाऱ्याने केले पाहिजे. वॉर्ड ऑफिस आणि निवडून आलेल्या सदस्यांनी वारसा असलेल्या ग्रामपंचायतींच्या विपरीत महापालिका व्यावसायिकपणे चालवली पाहिजेत. -नितीन जैन, वाघोली सोसायटीधारक.''

''वाघोलीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महानगरपालिकेतच राहणे योग्य राहील. महानगरपालिकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे करता येतील. -ज्ञानेश्वर कटके, जिल्हाप्रमुख, ठाकरे गट''

Web Title: Give Wagholi a separate municipality after Uruli Devachi and Fursungi Demand of villagers to Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.