मापदंडानुसार पाणी देण्याचा ‘अट्टहास’ भोवला..! जलसंपदातील मुख्य अभियंता मुंडे यांची बदली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 02:55 PM2019-02-13T14:55:40+5:302019-02-13T14:57:12+5:30
जलसंपत्ती प्राधिकरणाच्या निर्णयानुसारच शहराला पाणी पुरवठा केला जावा, अशी आग्रही भूमिका मुंडे यांनी घेतली होती.
पुणे : जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता टी. एन. मुंडे यांची औरंगाबाद येथील जललेखाच्या मुख्य अभियंतापदी बदली करण्याचा आदेश मंगळवारी राज्य सरकारने दिला. त्यांच्या जागी औरंगाबाद येथील जललेखाचे मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने पुणे शहराला वार्षिक ११.५० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी मंजुर केले आहे. म्हणजेच दररोज ८९२ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी शहराला मंजूर आहे. सध्या पुणे शहराचा दररोजचा पाणी वापर १३५० एलएलडी इतका आहे. हा पाणीवापर वार्षिक १७.४० टीएमसी इतका होतो. जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या निर्णयानुसार पाणी दिल्यास शहराच्या दररोजच्या पाणीवापरात सुमारे साडेचारशे एमएलडीची कपात करावी लागणार होती. मात्र, शहराचे पाणी कमी करण्यावरुन महानगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्याच्या पाणी वाटपाबाबत लक्ष घालावे लागले. त्यांनी देखील पुण्याला साडेतेराशे एमएलडी पाणी मिळेल असे जाहीर आश्वासन दिले.
दरम्यान, जलसंपत्ती प्राधिकरणाच्या निर्णयानुसारच शहराला पाणी पुरवठा केला जावा, अशी आग्रही भूमिका मुंडे यांनी घेतली होती. शहराला पाणी पुरवठा करणारे पंप देखील जलसंपदाने बंद करण्याची कारवाई केली होती. अशी कारवाई एकदा नव्हे तर तीनदा करण्यात आली. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे माजी मंत्री देखील पाणी कपातीवरुन राज्य सरकारला धारेवर धरत होते. जलसंपदा विभागाने पाणी रोखल्यानंतर महापौर मुक्ता टिळक यांनी आंदोलनाचा पवित्राही घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर मुंडे यांची बदली होणार असल्याची चर्चा जलसंपदा आणि महापालिकेच्या वर्तुळात दबक्या आवाजात सुरु होती. मंगळवारी रात्री उशिरा मुंडे यांच्या बदलीचा आदेश काढण्यात आला. त्यामुळे पुण्याच्या पाण्यामुळेच मुंडे यांची बदली झाली असल्याचे बोलले जात आहे.
-----------------