स्वत:साठी एक तास द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:13 AM2021-09-14T04:13:39+5:302021-09-14T04:13:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पोलिसांचे आरोग्य सदृढ असेल तर समाजाचे आरोग्यदेखील सदृढ राहील. प्रत्येकाने स्वत:साठी एक तास काढून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पोलिसांचे आरोग्य सदृढ असेल तर समाजाचे आरोग्यदेखील सदृढ राहील. प्रत्येकाने स्वत:साठी एक तास काढून व्यायाम करून आरोग्य सदृढ राखावे, असा मंत्र आयर्नमॅन डॉ. कौस्तुभ राडकर यांनी पोलिसांना दिला.
गणेशोत्सवाचा बंदोबस्त सुरू असताना त्यांच्यात कामासाठी उत्साह यावा, यासाठी समर्थ पोलिसांच्या वतीने आयर्नमॅन विजेत्यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले होते.
डॉ. कौस्तुभ राडकर, दशरथ जाधव, डॉ. राहुल झांजुर्णे, हेमंत परमार या आयर्नमॅन विजेत्यांनी पोलिसांना मार्गदर्शन केले. पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी त्यांचे स्वागत केले.
डॉ. राडकर यांनी सांगितले की, आयर्नमॅन स्पर्धेत सायकलिंग, स्वीमिंग व रनिंग हे प्रकार एकाच वेळेस दिलेल्या १६ तासांमध्ये पूर्ण करणे आवश्यक असते. प्रत्येकाने व्यायामासाठी एक तास स्वत:ला देणे आवश्यक आहे.
उद्योजक दशहर जाधव यांनी सांगितले की, वयाच्या ५६ व्या वर्षी व्यायामाला सुरुवात केली. उद्योगाचा सर्व व्याप सांभाळून आयर्नमॅनची तयारी केली होती. त्यामुळे आज ६४ व्या वर्षीही आरोग्य उत्तम आहे.
हेमंत परमार म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी आपले वजन १०६ किलो होते. सध्या ६६ किलो आहे. उत्तम आरोग्याचे रहस्य व्यायाम हे आहे.
डॉ. झांजुर्णे म्हणाले, की प्रत्येकास नवीन आव्हानासाठी तयार करण्याची ऊर्जा, चैतन्य हे व्यायामातून मिळत असते.
या वेळी समर्थ पोलीस ठाण्यामधील उत्कृष्ट कामगिरी करणारे अंमलदार रणजित उबाळे, संतोष काळे, सुशील लोणकर, जितेंद्र पवार, सुभाष पिंगळे, हेमंत पेरण, शुभम देसाई, सुभाष मोरे, नीलेश साबळे, सुमीत खुट्टे, विठ्ठल चोरमले, महेश जाधव, धीरज शिंदे, वनिता माेरे यांचा तसेच कोरोनाकाळात मदत करणाऱ्या २० पोलीस मित्रांचा सन्मान करण्यात आला.