लग्नाहून घरी परतणाऱ्या तरुणांवर काळाचा घाला
By admin | Published: April 19, 2017 04:08 AM2017-04-19T04:08:31+5:302017-04-19T04:08:31+5:30
चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावरील शेलपिंपळगाव (ता. खेड) हद्दीतील भीमा-भामा नदीशेजारील धोकादायक वळणावर अवजड कंटेनरने
शेलपिंपळगाव : चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावरील शेलपिंपळगाव (ता. खेड) हद्दीतील भीमा-भामा नदीशेजारील धोकादायक वळणावर अवजड कंटेनरने दुचाकीला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात मित्राच्या लग्नाहून घरी परतणारे दुचाकीवरील दोन निष्पाप तरुण जागीच ठार झाले असून अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.
चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : ही घटना रविवारी (दि. १६) रात्री साडेनऊच्या सुमारास भीमा-भामा पुलावर घडली. शिक्रापूर बाजूकडून चाकणकडे येत असलेल्या अवजड कंटेनरच्या (एमएच ०६ के ४४९१) चालकाचा अचानक वाहनावरील ताबा सुटला. दरम्यान, शेलगाव (ता. खेड) येथून मित्राचा विवाह आटोपून घरी जात असलेल्या दुचाकीवर अवजड कंटेनर (एमएच १२ २९८४) गेला. सुमारे दीडशे ते दोनशे फूट अंतर दुचाकीला ओढत नेऊन कंटेनर दुचाकीसह भीमा-भामा नदीच्या पात्रात अर्धवट कोसळला. अपघातात दुचाकीचा चेंदामेंदा झाला आहे.
या भीषण अपघातात दुचाकीवरील अमोल दत्ता शिंदे (वय २६) व नारायण रवींद्र शिंदे (वय २९, दोघेही रा. चंदननगर) यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. अन्य धनंजय गिरी (वय ३०, रा. चंदननगर) गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पाय व डोक्याला मोठी जखम झाली आहे. तसेच कंटेनरचालकही (नाव समजू शकले नाही.) जखमी झाला आहे. घटनास्थळी चाकण पोलिसांनी धाव घेऊन रात्री उशिरा स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. (वार्ताहर)