मनुवादाला ज्योतिबांच्या विचारांनीच द्यावे उत्तर : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 04:29 PM2018-11-28T16:29:24+5:302018-11-28T16:32:03+5:30
न्यायालयाच्या समोर मनुचा पुतळा बसविण्याचे काम राज्यकर्ते करतात.याचाच अर्थ मनुवादाचा विचार अजुनपर्यत समाजातील अधिकार पदावर असलेल्यांच्या डोक्यातून गेलेला नाही.
पुणे : देशात आता प्रतिगामी विचार वेगवेगळ्या माध्यमातून प्रसृत होताना दिसत आहेत. राजस्थानमधील एका न्यायालयाच्या समोर मनुचा पुतळा बसविण्यात आला आहे. न्यायालयाच्या समोर मनुचा पुतळा बसविण्याचे काम राज्यकर्ते करतात. याचाच अर्थ मनुवादाचा विचार अजुन पर्यत समाजातील अधिकार पदावर असलेल्यांच्या डोक्यातून गेलेला नाही. मनुवादाच्या हा विचारांना संपवायचे असेल तर ज्योतिबा आणि सावित्रीबाईंच्या विचारांनीच उत्तरे द्यावे लागतील, असे परखड मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्यावतीने १२८ वी महात्मा फुले पुण्यतिथी समता दिन साजरा करण्यात आला. यावेळी पवार यांना महात्मा फुले समता पुरस्कार पवार यांना माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गंज पेठेतील महात्मा फुले यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या कार्यक्रमाला देवीसिंग शेखावत, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ, सीतामढीचे खासदार रामकुमार शर्मा, महापौर मुक्ता टिळक, वंदना चव्हाण, पंकज भुजबळ, समीर भुजबळ, आदी मान्यवर उपस्थित होते. पवार म्हणाले, महात्मा फुले यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराची गोष्ट वेगळी आहे. फुले दाम्पत्यांनी ज्या सामाजिक कार्याकरिता आपले आयुष्य घालवले त्यांच्या कार्याची ओळख म्हणून देण्यात येणा-या पुरस्काराने मनात समाधानाची भावना आहे. आधुनिक विचारांचे पुरस्कर्ते म्हणून फुल्यांचे नाव घ्यावे लागेल. काळाची पावले ओळखुन त्यांनी समाजाला मार्गदर्शन केले. हयातभर समाजात समता, न्याय प्रस्थापित व्हावी याकरिता फुल्यांनी शेवटपर्यंत संघर्ष केला. साक्षरतेच्या प्रचार आणि प्रसाराचे काम त्यांनी सोडले नाही. आता मात्र मनुवादाचा विचार समाजात वाढत चालला आहे. मनुवादाचा विचार संपविण्याकरित्या ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची गरज आहे. हे विचार वाढविण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.
प्रतिभाताई पाटील म्हणाल्या, मानवी मुल्यांची जपवणूक ही महात्मा फुलेंच्या कार्याचा प्रेरणास्त्रोत होता. महात्मा फुले याची समानतेची धोरण आंबेडकर यांनी देखील मान्य असल्यानेच घटनेत महात्मा फुले यांच्या विचाराला अनुसरून घटना लिहिली गेली आहे. म्हणुनच घटना कोणाला गीता आहे. तर कोणासाठी अस्मिता आहे. दीन-दुबळ्यांना आधार देणारा तो एक आधार आहे. अशा मौलिक संविधानांचे आपण रक्षण केले पाहिजे. परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांनी प्रास्ताविक केले. प्रितेश गवळी यांनी आभार मानले.
................................
* फुल्यांचे विज्ञानविचार आम्हाला समजले कुठे ?
पिढ्यानपिढ्या ज्वारीचे उत्पादन घटत असताना ज्वारीच्या वाणाचा संकर करावा. असा विचार फुल्यांनी १५० वर्षांपूर्वी मांडला. आज आपण त्या विचारांना कृतीत आणत आहोत. तसेच दुधाचा धंदा वाढवायचा असल्यास देशी गायींकरिता विदेशातून वेगळा वाण आणा. यातून आपण क्रॉस ब्रीडींगची कल्पना पुढे आणली. केवळ शेतीवर अवलंबून न राहता त्याच्या जोडीला एखादा जोडधंदा करावा अशी सुचना फुल्यांनी केली. त्याकडे आम्ही दुर्लक्ष केले. अशाप्रकारे फुलेंचा आधुनिक विज्ञानाचा प्रचार आंिण प्रसार आम्हाला समजला नसल्याची खंत पवार यांनी यावेळी व्यक्त केली.