सरकारने दिले, बँकांनी नेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:09 AM2021-06-03T04:09:38+5:302021-06-03T04:09:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना निर्बंधातील मदत म्हणून सरकारने रिक्षाचालकांना दिलेले प्रत्येकी दीड हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना निर्बंधातील मदत म्हणून सरकारने रिक्षाचालकांना दिलेले प्रत्येकी दीड हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होऊ लागले आहेत. मात्र ते जमा होताच बँकांनी दंड म्हणून त्याची कपात करून घेण्यास सुरुवात केली आहे.
यात प्रामुख्याने राष्ट्रीयीकृत बँकांचा समावेश आहे. शहरात अनेक रिक्षाचालकांना बँकेकडून तसे संदेश येऊ लागले आहेत. बँक खाते पुन्हा कोरे होत आहे. आप रिक्षा चालक संघटनेचे आनंद अंकुश यांंनी ही माहिती दिली. सरकारी मदत जाहीर झाल्यावर सततचा पाठपुरावा केला तेव्हा महिनाभरानंतर मदत मिळाली. ती बँका कापून घेऊ लागल्याने गरीब रिक्षाचालकांवर अन्याय होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीयीकृत बँकांमधील खात्यात विशिष्ट रक्कम ठेवावी लागते. त्यापेक्षा कमी पैसे असतील तर दंड होतो. कोरोना टाळेबंदीमुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय बुडला आहे. बँक खात्यातील शिल्लकही संपली आहे. त्यामुळेच त्यांना सरकारने दीड हजार रुपयांची मदत दिली. पण आता ती बँक खात्यात जमा होताच बँका कापून घेत आहेत. परिणामी, रिक्षाचालकांचा खिसा फाटका तर फाटकाच राहात आहे.
अंकुश यांनी सांगितले की, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवहन मंत्री अनिल परब यांना ई-मेल केला आहे. बँकांना दंडवसुलीस मनाई करण्यासंदर्भात सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी संपर्क साधावा, असेे आवाहन यात करण्यात आले आहे.