१ किलो सोने स्वस्तात देतो; सोन्याचा मोह अंगलट, व्यापाऱ्याची ७ लाखांची फसवणूक
By नितीश गोवंडे | Published: March 13, 2024 03:34 PM2024-03-13T15:34:19+5:302024-03-13T15:34:37+5:30
व्यापारी घरी जाताना संबंधित सोनसाखळी एका सराफाला दाखवल्यावर ती बनावट असल्याचे उघडकीस आले
पुणे : स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने व्यापाऱ्याची सात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना ससून रुग्णालयाच्या परिसरात घडली. याप्रकरणी चाेरट्याविरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत परेश चिनूलाल शहा (५७, रा. रविवार पेठ) या व्यापाऱ्याने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजू प्रजापती नावाच्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापारी शहा यांचे रविवार पेठेतील दगडी नागोबा मंदिर परिसरात किराणा माल विक्रीचे दुकान आहे. प्रजापती त्यांच्या संपर्कात आला होता. स्वस्तात सोने देण्याचे आमिष त्याने शहा यांना दाखवले होते. शहा यांना एक किलो सोने देतो, असे आमिष दाखवून प्रजापतीने जाळ्यात ओढले. त्यांना ससून रुग्णालयाच्या आवारातील टाकीजवळ प्रजापतीने बोलावून घेतले.
तेथे आल्यावर प्रजापतीने शहा यांना बनावट सोनसाखळी दिली आणि त्याबदल्यात त्याच्याकडून सात लाख रुपये घेतले. त्यानंतर सोने कोणाला दाखवू नका. पिशवीत ठेवा, असे प्रजापतीने शहा यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी पिशवीत सोनसाखळी ठेवली. त्यानंतर, प्रजापती ससून रुग्णालयाच्या आवारातून पसार झाला. व्यापारी शहा हे घरी जात असताना त्यांनी, संबंधित सोनसाखळी एका सराफाला दाखवली. तेव्हा सोनसाखळी बनावट असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर शहा यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र गावडे करत आहेत.