जुन्या साउंड बॉक्सवर नवीन देतो; पेटीएमवर ऑफर असल्याचे सांगून दुकानदाराचे ३५ हजार लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 04:29 PM2022-11-21T16:29:08+5:302022-11-21T16:32:35+5:30
पेटीएमवर साऊंड बॉक्स ऑफर चालू असल्याचे सांगून एका चोरट्याने दुकानदाराला ३५ हजार रुपयांना गंडा घातला
पुणे: ऑनलाईन पेमेंट साठी बहुतांश दुकानदार आता पेटीएम सह विविध अॅपचा वापर करत आहेत. त्याचा गैरफायदा घेऊन फसवणुक करण्याचा नवा फंडा चोरट्यांनी अवलंबिला असल्याचे दिसून येऊ लागले आहे. पेटीएमवर साऊंड बॉक्स ऑफर चालू असल्याचे सांगून एका चोरट्याने दुकानदाराला ३५ हजार रुपयांना गंडा घातला.
याप्रकरणी वडगाव शेरी येथील एका किराणा दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अजितकुमार अक्षयकुमार पटनाईक (वय ३३, रा. चंदननगर) याला अटक केली आहे. हा प्रकार २२ ऑगस्ट ते २२ सप्टेबर दरम्यान घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे किराणा दुकान आहे. अजितकुमार हा त्यांच्या दुकानात आला. त्याने पेटीएमवर साऊंड बॉक्स ऑफर चालू आहे. जुन्या साऊंड बॉक्सवर नवीन साऊंड बॉक्स देतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या मोबाईल स्वत:कडे घेऊन त्यावरील पेटीएम पोस्टपेड कार्ड अॅक्टीव्हेट केले. फिर्यादी यांच्या पेटीएम पोस्टपेड कार्डमधून ३५ हजार रुपयांचे ट्रान्झेक्शन करुन त्यांची आर्थिक फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक रेवले तपास करीत आहेत.