पूर्णत्वाचा दाखला देण्यापूर्वी इमारतीप्रमाणे सीमाभिंतीची सक्षमता पाहणे आवश्यक: रामचंद्र गोहाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 07:00 AM2019-07-07T07:00:00+5:302019-07-07T07:00:01+5:30
पुण्यात काही दिवसांपूर्वी सीमाभिंत कोसळून काही जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या, त्या पार्श्वभूमीवर सीमाभिंत बांधकामा नेमके कसे असावे याविषयी माहितीपूर्ण लेख
पुणे : पुणे शहरातील ट्रॉपोग्राफी भौगोलिक रचना ही उंच सखल आहे़ विशेषत: शहराच्या उपनगरांमध्ये ते अधिक आहे़.असे असताना इमारती बांधताना त्याचा विचार न करता बांधकाम केले जाते़. इमारतीप्रमाणेच त्याची सीमाभिंतीसाठी पाया घेणे व ती सक्षम आहे की नाही, हे पाहणे महापालिकेच्या बांधकाम विभागाची जबाबदारी आहे़. त्याविषयी खात्री केल्याशिवाय त्यांनी पूर्णत्वाचा दाखला देणे अयोग्य आहे़. त्यामुळे कोंढव्यातील इमारतीला पूर्णत्वाचा दाखला दिल्यानंतर काही दिवसात त्याची सीमा भिंत कोसळून १५ कामगारांच्या मृत्यु प्रकरणात महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबरच बांधकाम व्यावसायिक व ठेकेदारही तितकेच जबाबदार आहेत, असे ज्येष्ठ नगररचनाकार तज्ञ रामचंद्र गोहाड यांनी सांगितले़.
कोंढव्यातील अॅक्लोन स्टायलीस या सोसायटीची सीमाभिंत कोसळून त्यात १५ कामगारांचा मृत्यु झाला होता़. त्यापाठोपाठ सिंहगड इस्टिट्युटची सीमाभिंत कोसळून ६ कामगारांचा मृत्यु झाला होता़. याबाबत रामचंद्र गोहाड यांनी सांगितले की, पूर्वी नगर रचना कायदा होता़. त्यानंतर १९५४ मध्ये विकास योजना आली़. त्यानंतर १९६६ मध्ये डेव्हलपमेंट प्लॅन आला़. १९७५ साली त्यासंबंधी नियम आले़. त्यावर केंद्र सरकारने एक कमिटी नेमली़ त्यांनी सर्व राज्यात जाऊन तेथील नियमांचा अभ्सास केला़ त्यावरुन प्रमाणित नियमावली तयार केली़. त्यानुसार इमारतीच्या सुरक्षिततेप्रमाणेच त्या जागेसभोवताली बांधलेल्या सीमाभिंतीचे बांधकामाबाबतही नियम तयार करण्यात आले आहेत़.
त्यानुसार सीमा भिंत बांधताना इमारतीप्रमाणेच त्याचा पाया भक्कम व दीड मीटर असावा़. तो दगड बांधकामाचा असावा़. सीमा भिंतीची उंची कमीतकमी ५ फुट असावी़ अनेक ठिकाणी विशेषत: अनेक पंचताराकिंत हॉटेल व काही सोसायट्या अगदी ७ फुटापर्यंत उंच सीमाभिंत बांधतात़. ही सीमा भिंत बांधताना त्याचे बांधकाम किमान ११ इंच जाडीची असावे़. त्याच्या दोन्ही बाजूने प्लॉस्टर असावे़. तसेच सीमा भिंतीत अडीच ते तीन फुटानंतर सिमेंट, लोखंड, खडी यांची पडदी टाकणे बंधनकारक आहे़.
महापालिकेकडून क्षेत्रीय कार्यालयातील कार्यकारी अभियंत्याची त्याच्या क्षेत्रातील बांधकामांची तपासणी करण्याचे काम असते़. इमारतीच्या जोत्याच्या वेळी सीमाभिंतीचे बांधकाम झाले असेल तर त्यावेळी त्याने तपासणी करावी़. इमारतीला बांधकामाच्या पूर्णत्वाचा दाखला देण्यापूर्वी सीमा भिंतीची तपासणी करणे व तिचे बांधकाम करताना नियमावलीचे पालन केले आहे, याची तपासणी करुन खात्री करण्याची जबाबदारी या अभियंत्याचे आहे़. त्याचबरोबर नियमानुसार सीमा भिंतीचे बांधकाम करण्याची जबादारी विकसकावरही आहे़. त्यामुळे कोंढव्यातील दुर्घटनेत जसे त्यांना पूर्णत्वाचा दाखला देणारा अधिकारी जबाबदार आहे़. त्याचप्रमाणे विकासकही तितकाच जबाबदार आहे़
दत्तवाडी येथे सीमाभिंत कोसळून त्यात काही जणांचा मृत्यु झाला होता़. त्यानंतर सीमाभिंतीचे बांधकाम आरसीसीमध्ये केलेला ठेकेदार व त्या सिमा भिंतीचे डिझाईन केलेल्या डिझायनर यांचे ती सीमाभिंत सक्षम असल्याबाबतचे सर्टिफिकेट घेण्याचा नियम महापालिकेने केला आहे़.