गो-आधारित शेतीने शेतकऱ्याला मिळवून दिला सन्मान - राज्यपाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 01:25 AM2019-02-20T01:25:52+5:302019-02-20T01:26:12+5:30
शेतीनिष्ठ पुरस्कार प्रदान : पिंपळोलीच्या नवनाथ शेळके यांनी नैसर्गिक शेतीने केली अवास्तव खर्चावर मात
घोटवडे : पिंपळोली (ता. मुळशी) येथील युवक शेतकरी नवनाथ सोपान शेळके डोंगराळ भागात कोरडवाहू शेती असलेल्या गावातील शेतकरी, परंतु काहीतरी वेगळे करण्याची जिद्द. नवनाथ शेळके हे एकत्र कुटुंब पद्धतीने राहणारे आहेत. त्यांना दोन भाऊ असून मोठे बंधू पिंपळोलीचे माजी सरपंच बाबाजी शेळके, तर दुसरे बंधू गोरख शेळके उत्कृष्ट गोपालक आहेत. पूर्वी या भागात शेतीमध्ये पावसावर येणारे पारंपरिक पिक हे फक्त भात, नंतर हरभरा, मसूर, काळा वाटाणा अशी पिके घेतली जात असत. या परिसरातील नागरिक पुणे, मुंबई येथे नोकरीसाठी जात होते.
अधिक उत्पन्न देणारी कमी खर्चाची आधुनिक शेती करण्याचे ठरविले. विविध ठिकाणाहून मार्गदर्शन घेऊन त्यांनी टोमॅटो, काकडी, दोडका अशी भाजीपाल्याची नगदी पिके सेंद्रिय पद्धतीने घेण्यास सुरुवात केली. रासायनिक खत न देता घरी तयार केलेले जिवामृत ठिबक पद्धतीने देऊन उत्तम पिके घेतली जातात. नैसर्गिक खतामुळे पिके जोमात येऊन टवटवीत भाजीपाला बाजारात जाऊ लागला. हंगाम सोडून माल उत्पादित केल्यामुळे बाजारभाव चांगला मिळू लागला. शेतीबरोबर त्याने खतासाठी देशी गार्इंचे पालन सुरू केले आहे. देशी जातीच्या साहिल गाई सांभाळल्या असून त्यांना रसायनविरहित खाद्य दिले जाते. आझोला, मुरघास, नेपीयर गवत, मका, ज्वारी कडबाकुट्टी हे घरच्या शेतीवर रासायनिक खताचा वापर न करता त्यांना दिले जाते. त्यामुळे दुधाला ८० रु. प्रतिलिटर भाव मिळतो. आज त्याच्याकडे ४० जनावरे देशी असून प्रत्येकी ८ ते १० लिटर दूध मिळते. शेतात खत म्हणून गाईच्या शेण, मूत्र एकत्र करून त्यात गूळ, बेसनपीठ घालून पाण्यात तीन दिवस भिजत ठेवून त्यापासून तयार झालेले जिवामृत त्यानंतर ते फिल्टर करून ठिबकद्वारे शेतीस दिले जाते. पाणीही ठिबक पद्धतीने दिले जाते. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते. यावर्षी त्यांनी महाबळेश्वर येथे प्रसिद्ध असलेली स्ट्रॉबेरी लागवड करून उत्पादन सुरू केले आहे. आय. टी. पार्कमुळे शेतातील कामाला कामगार मिळत नाही. तरी कुटुंबातील सर्व महिला-पुरुषांची शेतीतील कामाला मदत घेतली जाते.
नवनाथ शेळके फक्त स्वत:च्याच शेतीत बदल करत नाहीत करून थांबलेले नाही तर परिसरातील शेतकºयांना पाणी देऊन ती पिके घेऊन मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शेतकºयांनी नैसर्गिक शेतीची वाट चोखाळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या भागातील शेतकºयांचे जीवनमान बदलण्यास मदत होत आहे.
नवनाथ शेळके यांना आतापर्यत महाराष्ट्र शासनाचा वसंतराव
नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, जिल्हा परिषद कृषी भूषण
पुरस्कार, लुपिन फाउंडेशन ग्रामीण विकास उत्कृष्ट कार्य पुरस्कार
आदी पुरस्काराने सन्मानित
करण्यात आले आहे.
मला मिळालेला महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार महाराष्ट्रात फक्त ११० शेतकºयांना, तर जिल्ह्यात फक्त ४ शेतकºयांना सन्माननीय राज्यपाल यांच्या हस्ते दिला गेला आहे. मिळालेल्या या पुरस्कारामुळे शेतीत नवनवीन प्रयोग करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
- नवनाथ शेळके, प्रगतशील शेतकरी