दागिने घडविण्यासाठी सोने देणे सराफाला पडले महागात; ४२ लाखांचे सोने चोरून कारागीर पसार
By नम्रता फडणीस | Published: August 6, 2024 03:34 PM2024-08-06T15:34:53+5:302024-08-06T15:35:32+5:30
सोने दिल्यानंतर आरोपी दागिने घडवून न देता पसार झाल्याचे उघडकीस आले
पुणे: दागिने घडविण्यासाठी सोने देणे सराफी व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले आहे. ४२ लाखांचे सोने चोरून कारागीर पसार झाल्याची घटना समोर आली आहे. सराफ व्यावसायिकांची फसवणूक केल्याप्रकरणी एका कारागिराविरुद्ध फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश शंकर माईती (सध्या रा. रविवार पेठ, मूळ रा. विष्णूबुराह, मेदनीपूर, पश्चिम बंगाल) पसार झालेल्या कारागीराचे नाव आहे. याबाबत सराफ व्यावसायिक मयूर प्रफुल्लचंद्र सोनी (वय ३५, रा. रास्ता पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सोनी सराफ व्यावसायिक आहेत. आरोपी रमेश माईतीला सराफ व्यावसायिक सोनी आणि जाॅयनाथ माईती यांनी ४२ लाख २१ हजार रुपयांचे सोने दागिने घडविण्यासाठी दिले होते. सोने दिल्यानंतर आरोपी रमेशने त्यांना दागिने घडवून दिले नाहीत. सोनी आणि माईती यांनी विचारणा केली. तेव्हा आरोपी रमेश सोने घेऊन पसार झाल्याचे उघडकीस आले. सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड तपास करत आहेत. व्यावसायिकाने विश्वास ठेवून दागिने घडवण्यासाठी दिले होते. मात्र कारागिराने व्यावसायिकाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.