विद्यापीठात सलग १८ तास अभ्यास करून महामानवाला अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 14:01 IST2018-04-14T14:01:53+5:302018-04-14T14:01:53+5:30
या उपक्रमाचे शुक्रवारी सकाळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

विद्यापीठात सलग १८ तास अभ्यास करून महामानवाला अभिवादन
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयामध्ये २०० विद्यार्थ्यांनी सलग १८ तास अभ्यास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. शुक्रवारी सकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत हा उपक्रम राबविण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पोस्ट ग्रज्युएट स्टुडंन्ट असोसिएशन (डाप्सा) या संघटनेच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून विद्यापीठामध्ये आंबेडकर जयंतीच्या आदल्या दिवशी हा उपक्रम राबविला जात आहे. डाप्साचे पदाधिकारी अमोल सरवदे, सागर सोनकांबळे, प्रज्ञानंद जोंधळे, समाधान सरवदे, सुरज मोरे, सूर्यकांत गायकवाड यांनी याचे आयोजन केले होते. सकाळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. विजय खरे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रमुख डॉ. प्रभाकर देसाई उपस्थित होते. सलग १८ तास अभ्यास करण्याच्या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन वेळचे जेवण, चहा, नाष्टा यांची व्यवस्था करण्यात आली होती.