जातीवाचक उल्लेख करून युवकाच्या डोक्यात गजाने वार
By admin | Published: June 29, 2017 03:33 AM2017-06-29T03:33:33+5:302017-06-29T03:33:33+5:30
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त आलेल्या पाळण्यात मागासवर्गीय युवकांना बसण्याचा मज्जाव करुन जातीवाचक उल्लेख
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त आलेल्या पाळण्यात मागासवर्गीय युवकांना बसण्याचा मज्जाव करुन जातीवाचक उल्लेख करुन डोक्यात कोयत्याने, गजाने वार केले. पिस्तूल रोखून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार काल (दि.२७) रात्री इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. एकास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. गणेश बाळू पवार, दुर्गा पवार,विवेक चौगुले, अमर मिसाळ, भैय्या वायदंडे, राहूल बाळू पवार (सर्व रा. वडारगल्ली, इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर बेकायदा शस्त्र बाळगणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे व अनुसुचीत जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. चेतन अनिल ढावरे (रा. लोकशाहिर अण्णाभाऊ साठेनगर, इंदापूर) असे फिर्यादीचे नाव आहे. तो आणि त्याचा भाऊ विवेक ढावरे मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत.
या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,पालखी सोहळ्या निमित्त भार्गवराम बगिचा शेजारच्या टाऊन हॉल समोरच्या पटांगणात यांत्रिक पाळणे आले आहेत. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास फियार्दी चेतन हा पाळण्यामध्ये बसण्यासाठी गेला होता. त्यावेळी आरोपींनी त्यास अडवले. पाळण्यात बसायचे नाही असे म्हणत, जातीवाचक उल्लेख करत आरोपी गणेश पवार याने हातातील कोयत्याने त्याच्या डोक्यात वार केला.
दुर्गा पवार गजाने डोक्यातच मारहाण केली. हा प्रकार पाहून फिर्यादीचा भाऊ विवेक फिर्यादीला सोडविण्यासाठी मध्ये आला. तेव्हा आरोपींनी त्याला ही गज, कोयता व लाथाबुक्यांनी मारहाण केली. दुर्गा पवारने त्याच्या जवळचे पिस्तुल फिर्यादीवर रोखले. गोळ्या घालण्याची धमकी दिली. अशा आशयाच्या फियार्दीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.