‘तुम्हाला तुमच्या परिवाराला पेट्रोल दरवाढीच्या शुभेच्छा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 05:58 AM2018-05-24T05:58:05+5:302018-05-24T05:58:05+5:30

सोशल माध्यमातून तीव्र निषेध : पुणेरी भाषेत सरकारचा पाहुणचार

'Giving your petrol price hike to your family' | ‘तुम्हाला तुमच्या परिवाराला पेट्रोल दरवाढीच्या शुभेच्छा’

‘तुम्हाला तुमच्या परिवाराला पेट्रोल दरवाढीच्या शुभेच्छा’

Next

पुणे : गोखलेकाका आपली गाडी ढकलत पेट्रोल पंपावर येतात. ‘काका कितीचे पेट्रोल भरू,’ पंपावरील कामगार त्यांना विचारतो. त्यावर काकांचा रागाचा पारा चढतो. ‘भरतोस कसलं, नुसतं १० रुपयांचं शिंपड. पेटवूनच टाकतो.’ दुसरीकडे पेट्रोलियममंत्र्याचे नाव ही खरी समस्या आहे. धर्मेंद्र यांना अजूनही वाटते, की बसंतीचा टांगा सव्वादोन रुपयांत ठाकूरच्या हवेलीवर सोडतो. या मेसेजमधून संंबंधित खात्याच्या मंत्र्यांवर घेतलेले तोंडसुख असो किंवा ‘गाडी आज उभी केली दारी, सायकल घेऊन निघालो कामावरी, पूर्ण होवोत तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला पेट्रोल दरवाढीच्या हार्दिक शुभेच्छा...!’ यातून सरकारची यथेच्छ टवाळी केली जात आहे.
पेट्रोलचा भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने या दरवाढीचा सोशल माध्यमांवर सरकारचा पुणेरी शैलीत निषेध व्यक्त केला जात आहे. अन्न, वस्त्र, निवारा यांबरोबरच रोजच्या जगण्यात सर्वांत महत्त्वाच्या पेट्रोलच्या चढ्या भावाने सर्वसामान्यांचे धाबेच दणाणले आहे. याबद्दल गेल्या काही दिवसांपासून सध्या सोशल माध्यमावर उलट-सुलट प्रतिक्रियांना ऊत आला आहे. त्यावर एकूणच महागाईविरोधात तोंडसुख घेतले जात आहे. पेट्रोलचा भाव चक्क ८४.५४ रुपये झाल्याने याविषयी अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. पेट्रोलच्यासंदर्भात अनेक दिवसांपासून सरकारविरोधी असलेली खदखद सोशल माध्यमातून पुढे व्यक्त होत आहे. एक-दोन नव्हे, तर दहा दिवसांमध्ये सतत पेट्रोलच्या किमतींमध्ये वाढ झाल्याने नागरिकांचा रागाचा पारा वाढला आहे. एकीकडे वाढत्या गर्मीने हैराण झालेल्या नागरिकांना पेट्रोल दरवाढीने चांगलाच घाम फोडल्याने त्याचा त्रास अन् त्रागा तिखट प्रतिक्रियेंच्या माध्यमातून पाहावयास मिळत आहे. भाजपाने सत्तेवर येण्याआधी पेट्रोलचे भाव नियंत्रित ठेवण्याचे आश्वासन दिले होते. तेच आता दरवाढ करत असल्याने सामान्य नागरिकांची लूटमार थांबणार कधी, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. एकीकडे पेट्रोल दरवाढ झाली दुसऱ्या बाजूला फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर त्यावर सडेतोडपणे भाष्य करणाºया कविता, विनोदी चुटकुले, वात्रटिका, चारोळ्यांचा पाऊस पडण्यास सुरु वात झाली आहे. याला सर्व स्तरांतून पसंती मिळत असून, काही
ठिकाणी तक्रारींचा सूर अनेकांनी आळवला. त्यामुळे सोशल माध्यमांवरदेखील सरकारच्या बाजूने व सरकारच्याविरोधातील असे दोन गट पडल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. सर्वसामान्य माणूस महागाईने चिंतेत असताना त्यात पेट्रोलची होणारी दरवाढ त्याचे कंबरडेच मोडणारी आहे.
यावर ‘रोज रोज वाढतोय दर, सर्वसामान्य भरतोय कर, देवा आता तूच काही कर, सरकारचे कुणालाच नाही का डर’ अशा प्रकारच्या चारोळ्यांमधून नागरिकांची वेदना मांडली जात आहे. याशिवाय विविध व्हिडीओ क्लीपमधूनदेखील राग व्यक्त केला जात आहे. एक व्यक्ती जी हेल्मेट घालून आपल्या गाडीवर निघाली आहे, मात्र ती गाडी स्वयंचलित नसून तिला एक गाढव ओढत आहे. अनेक संघटना, राजकीय पक्ष यांनी वाहनांच्या पेट्रोल टाक्यांना हार घालून निषेध केला आहे.
 

Web Title: 'Giving your petrol price hike to your family'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.