पाणीबचतीसाठी ग्लासचा आकार केला निम्मा
By admin | Published: May 15, 2016 12:47 AM2016-05-15T00:47:31+5:302016-05-15T00:47:31+5:30
पाणीबचतीसाठीच्या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन पुण्यातील हॉटेल व्यावसायिक जलमित्र बनले आहे. पाणीबचतीसाठी विविध उपाय योजना हॉटेल्सनी सुरू केल्या आहेत
पुणे : पाणीबचतीसाठीच्या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन पुण्यातील हॉटेल व्यावसायिक जलमित्र बनले आहे.
पाणीबचतीसाठी विविध उपाय योजना हॉटेल्सनी सुरू केल्या आहेत. एका हॉटेलने तर पाणी वाया जाऊ नये यासाठी ग्लासचा आकारच निम्मा केला आहे.
हॉटेलमध्ये पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. आदर्श हॉटेलमध्ये ग्राहक आल्यावर पहिल्यांदा त्याला पाणी दिले जाते. मात्र, अनेक जण ग्लासमधील अर्धेच पाणी पिऊन उरलेले तसेच ठेवतात़ त्यात मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते़ हे लक्षात घेऊन पुण्यातील वैशाली हॉटेलने सर्व मोठे ग्लास काढून टाकून छोटे ग्लास आणले आहेत.
‘लोकमत’ने सुरू केलेल्या जलमित्र अभियानाला पुणे रेस्टॉरंट अॅँड हॉटेलियर्स असोसिएशनने सक्रिय प्रतिसाद दिला. याबाबत ‘लोकमत’च्या व्यासपीठावर असोसिएशनची बैठक होऊन पाणीबचतीसाठी विविध उपाययोजना राबविण्याचे ठरले. त्यानुसार शहरातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंटचालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असून, आपल्या रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारे पाणीबचत करण्यास सुरुवात केली आहे़
फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल वैशालीचे मालक जगन्नाथ शेट्टी यांनी सांगितले की, पाण्याचा काळजीपूर्वक वापर करणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे़ दुष्काळीस्थितीची जाणीव होताच, आम्ही आमच्या सर्व स्टाफला एकत्र करून, याची कल्पना दिली़ येणाऱ्या ग्राहकांना अर्धा ग्लास पाणी दिले तर त्याला काय वाटेल, याचा विचार करून आम्ही हॉटेलमध्ये वापरले जाणारे सर्व मोठे ग्लास काढून टाकले व त्याऐवजी छोट्या आकाराचे ग्लास नव्याने विकत आणून ते वापरण्यास सुरुवात केली़ त्यामुळे ग्राहकांनाही पाणी कमी दिल्यासारखे वाटत नाही आणि छोटे ग्लास वापरल्याने पाण्याचीही बचत होत आहे़
ज्या व्यवसायातून आपण पैसे कमवितो, त्यातील प्रश्न सोडविण्यासाठी तेथूनच मिळविलेला पैसा खर्च करावा लागला, तर मागेपुढे पाहण्याचे कारण नाही़ शेवटी प्रश्न सोडविणे महत्त्वाचे वाटल्याचे शेट्टी यांनी सांगितले़
हॉटेल निसर्ग गार्डनमध्ये पाणी बचतीविषयी विविध उपाय योजना राबविण्यात आल्या आहेत़ याबाबत पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष जवाहर चोरगे म्हणाले, हॉटेलमध्ये सर्वांत जास्त पाण्याचा वापर होतो, तो वॉश बेसिनमध्ये. तेथील नळाला प्रिंक्लरसारखे नॉब बसविण्यात आले़ त्यावर जाळी बसविली़ या नळातून पूर्वी मिनिटाला १२ लिटर पाणी येत असे़ आता जाळी बसविल्याने मिनिटाला ४ लिटर पाणी येत आहे़ जवळपास ८ लिटर पाण्याची बचत होत आहे़ याशिवाय सर्व कर्मचाऱ्यांना आलेल्या ग्राहकांना अर्धा ग्लास पाणी देण्याच्या सूचना दिल्या आहेत़ पूर्वी रात्री हॉटेल धुताना कर्मचारी पाइप लावून पाणी मारून धूत असे़ आता बादलीत पाणी घेऊन ते ओतून साफसफाई करण्यास सांगितले आहे़ बाथरूममधील फ्लॅशला जास्तीत जास्त पाणी वापरले जाते़ या फ्लॅशचा फ्लो कमी केला असून, तो फ्लॅश कोणी हलवून नये, म्हणून त्यावर जाळी बसविली आहे़ पूर्वी त्यातून एकावेळी ५ ते ८ लिटर पाणी वापरले जात होते़ आता त्यातून २ -३ लिटर पाणी वापरले जात आहे़
पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी म्हणाले, आमच्या असोसिएशनच्या वतीने सर्व सभासदांना पाणी बचतीच्या सूचना दिल्या आहेत़ जवळपास सर्वांनी त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे़ त्यातून शहरातील हॉटेल व रेस्टॉरंटमधून मोठ्या प्रमाणावर पाणी बचत होत आहे़ हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना पाणी देण्याऐवजी आम्ही प्रत्येक टेबलावर बाटल्या ठेवल्या आहेत़ त्यांनी पाणी मागितल्यावर अर्धा ग्लास पाणी देण्यास आम्ही सुरुवात केली आहे़ त्यातूनही काही जणांनी पाणी अर्धवट ठेवले तर किचनमध्ये एक टब ठेवण्यात आला आहे़ त्यात हे पाणी जमा केले जाते़ हे पाणी इतर कामासाठी वापरण्यात येत आहे़ - जयंत शेट्टी (गंधर्व रेस्टॉरंट) पाणीबचतीसाठी आम्ही यापूर्वीच प्रयत्न सुरू केले़ सर्व स्टाफला एकत्र बोलावून त्यांना सांगितले की, पूर्वी तुम्ही जे काम १ लिटर पाण्यात करायचा, तेच काम आता अर्ध्या लिटर पाण्यात करायचे आहे़ तेही स्वच्छ असले पाहिजे़ पाणी- बचतीची जाणीव कर्मचाऱ्यांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न केल्याने आम्हाला चांगले यश मिळाले आहे़
- जगन्नाथ शेट्टी
(हॉटेल वैशाली) वॉशबेसिन, बाथरूममध्ये पाण्याचा कमीत कमी वापर व्हावा, यासाठी बाजारात अनेक नावीन्यपूर्ण साहित्य आले आहे़ त्याचा वापर केल्याने पाण्याची बचत होत आहे़ कर्मचाऱ्यांनाही बचतीची सवय लावली आहे़ अशा विविध उपाय योजनेतून २५ ते ३० टक्के पाणी बचत होत आहे़
- जवाहर चोरगे
(हॉटेल निसर्ग गार्डन)
> पुणेकरांच्या पाण्यावरचे बोलणे मानहानीचे
पुणे: पुणेकर वापरत असलेल्या पाण्याचा अभ्यास करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे वक्तव्य पुणेकरांची मानहानी करणारे असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. महापालिकेत उघड व राज्यात छुपी सत्ता तुमचीच आहे, पुणेकरांच्या पाण्याचा हिशोब कराच असे खुले आव्हान मनसेने पवार यांना दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर पुण्याच्या प्रश्नांवर झालेल्या बैठकीत बोलताना पवार यांनी पुणेकरांच्या पाणी वापरण्याचा अभ्यास झाला पाहिजे असे वक्तव्य केले होते. पुणेकरांना ज्या धरणसाखळीतून पाणी पुरवठा होतो ती प्रामुख्याने शेतीच्या पाण्यासाठीच बांधलेली असल्याचे सांगत त्यांनी अन्य शहरे व पुणेकर वापरत असलेले पाणी याचा अभ्यास करण्याचे मत व्यक्त करीत पुणेकरांना पाणी जास्त लागत असल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले होते.
मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी पवार यांच्यासारख्या नेत्यांनी असे बोलावे याबाबत आश्चर्य व्यक्त केले. गेले ८ महिने पुणेकर दिवसाआड पाणी वापरत आहेत. पाण्याची टंचाई असतानाही पाण्याचा अपव्यय सहन करून दौंड-इंदापूरसाठी पाणी दिले.
पुणेकरांचा हा त्याग एकीकडे व दुसरीकडे तुमचा आशिर्वाद असलेल्या लवासा प्रकल्पाचा पाणीपुरवठा कायम, मगरपटट्टा सिटीला बंद पाईपद्वारे थेट धरणातून पाणी पुरवठा कायम, बाटलीबंद पाणी विकणाऱ्या उद्योगांना भूजल उपशाची परवानगी हे सगळे कसे काय अशी विचारणा शिंदे यांनी केली आहे.. (प्रतिनिधी)