बर्गरमध्ये काचेचे तुकडे ; पुण्यातील बर्गर किंगमधील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 12:45 PM2019-05-21T12:45:25+5:302019-05-21T12:48:53+5:30
पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील बर्गर किंगमध्ये बर्गर खाण्यासाठी आलेल्या साजिद पठाण यांच्या बर्गरमध्ये काचेचे तुकडे आढळल्याची घक्कादायक घटना समाेर आली आहे.
पुणे : पुण्यातल्या फेमस अशा बर्गर किंगमध्ये बर्गर खाण्यासाठी आलेल्या चार मित्रांना त्यांची पार्टी चांगलीच महागात पडली. बर्गर खाताना त्यात असणाऱ्या काचेच्या तुकड्यांमुळे साजिद पठाण (वय 31) यांना घशाला जखम झाली आहे. हा प्रकार बुधवारी घडला. याबाबत रविवारी डेक्कन पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर हा प्रकार समाेर आला. याप्रकरणी डेक्कन पाेलीस तपास करत आहेत.
साजिद पठाण हे रिक्षाचालक आहेत. बुधवारी ते दुपारी त्यांच्या काही मित्रांसाेबत पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील बर्गर किंगमध्ये खाण्यासाठी गेले हाेते. तेथे त्यांनी बर्गर ऑर्डर केले हाेते. बर्गर खात असताना साजिद यांना घशात काहीतरी टाेचल्यासारखे झाले. ते दुखायला लागल्याने त्यांनी त्यावर थंडपेय घेतले. त्यानंतर त्यांच्या घशातून रक्त येऊ लागले. तसेच त्यांना उलटीचा त्रास हाेऊ लागला. त्यांच्या मित्रांनी बर्गर पाहिले असता त्यात काचेचे तुकडे आढळून आले. साजिद यांना अधिक त्रास हाेऊ लागल्याने त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर त्यांना सह्याद्री रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. सध्या साजित यांची प्रकृती ठिक असून ते उपचार घेत आहेत.
ज्यावेळी पठाण यांचे मित्र बर्गर किंगकडे जाब विचारण्यास गेले त्यावेळी तुम्हीच बर्गर किंगला बदनाम करण्यासाठी काच बर्गरमध्ये टाकली असेल असा आराेप बर्गर किंगकडून करण्यात आला. दरम्यान पठाण आणि त्यांच्या मित्रांनी रविवारी बर्गर किंगच्या विराेधात डेक्कन पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन बर्गर किंगच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डेक्कन पाेलीस स्टेशनचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक दीपक लगड हे अधिक तपास करत आहेत. पाेलिसांनी बर्गर किंगमधील सीसीटिव्ही फुटेज तपासले असून त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे.