कवडीपाट येथे रविवारी होणार चकाचक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:16 AM2021-09-17T04:16:02+5:302021-09-17T04:16:02+5:30
पुणे : पावसाळ्यात दर वर्षी मुठा नदीत शहरातील कचरा वाहून कवडीपाट येथील पुलाल अडकतो. त्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड कचरा ...
पुणे : पावसाळ्यात दर वर्षी मुठा नदीत शहरातील कचरा वाहून कवडीपाट येथील पुलाल अडकतो. त्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड कचरा साठतो. येथे पक्षी निरीक्षणाचे स्थळ असल्याने या कचऱ्यामुळे पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. म्हणून स्वच्छ भारत स्वच्छ पुणे संस्थेतर्फे रविवारी (दि.१८) सकाळी स्वच्छता मोहीम आयोजित केली आहे.
विविध संस्था एकत्र येऊन येथे स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यामध्ये कदमवाक वस्ती ग्रामपंचायतीतर्फेही सहभाग असणार आहे. पक्षीनिरीक्षक, पक्षिप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींनी देखील यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक विंग कमांडर पूनित शर्मा यांनी केले आहे.
कवडीपाट येथे सुमारे २०० हून अधिक विविध प्रजातींचे पक्षी पाहायला मिळतात. त्यामुळे दररोज सकाळी फोटोग्राफर, पक्षीनिरीक्षकांची येथे हजेरी लागलेली असते. परंतु, येथील कचऱ्यामुळे पक्ष्यांना अन्न मिळवताना अडचणी येतात. परिणामी, येथे येणाऱ्या पक्ष्यांची संख्या कमी होत असल्याची माहिती पक्षीनिरीक्षक विशाल तोरडे यांनी दिली.