'गौरवास्पद' कामगिरी ! पुण्यातील तरुणाचा 'मॅग्नोलिया' लघुपट आंतरराष्ट्रीय स्तरावर!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 12:57 PM2020-10-05T12:57:36+5:302020-10-05T13:03:32+5:30
विक्रम यांच्या या आधीच्या 'द ड्रेनेज'लघुपटालाही फिल्म फेअर पुरस्कारही मिळाला होता.
पुणे : पिढी बदलली की विचारही बदलतात असं म्हटलं जातं...नात्यांच्या बाबतीतही असंच घडतं! तरुणाईला गवसलेली नात्यांची नवी व्याख्या...नात्यांचे भावबंध, गुंतागुंत...त्यांच्या भावविश्वातील गुंतागुंत...या सगळ्याचा वेध घेतला आहे पुण्यातील विक्रम रामदास या तरुणाने! विक्रम यांच्या 'द ड्रेनेज' या लघुपटाला फिल्म फेअर पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर 'मॅग्नोलिया' या लघुपटातून त्यांनी नवा विषय हाताळण्याचा प्रयत्न केला आहे.
विक्रम याचा या आधीचा लघुपट म्हणजे 'द ड्रेनेज'. खेड्यातला एक माणूस नवीन मोबाइल घ्यायला शहरात येतो आणि त्याने घेतलेला मोबाइल एका ड्रेनेजमध्ये पडतो. मग त्या माणसाची त्या ड्रेनेजमधून मोबाइल मिळवण्याची धडपड 'द ड्रेनेज' मधून मांडण्यात आली आहे. या लघुपटाने अनेक आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळवले. या यशानंतर आता विक्रम 'मॅग्नोलिया' हा लघुपट घेऊन रसिकांच्या भेटीला येत आहे.
विक्रम रामदास मूळचा अकोल्याचा. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तो २००७ साली पुण्यात आला. अभ्यास सुरू असतानाच सहज म्हणून त्याने नाटकाची एक कार्यशाळा केली आणि तो त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. लघुपट, नाटक, सिनेमा या क्षेत्रातच करिअर करायचे त्याने मनाशी पक्के केले आणि मग सुरू झाला प्रवास सर्जनशीलतेचा! नवाजुद्दीन सिद्दीकीचे 'मॅजिक इफ फिल्म्स' आणि मुकेश छाब्रा यांनी एक शॉर्ट फिल्मची स्पर्धा घेतली होती. त्यामध्ये विक्रांतच्या संहितेची निवड झाली. शॉर्ट फिल्मचे चित्रीकरण पूर्ण करण्यासाठी त्याला २० दिवसांची मुदत मिळाली. सुरुवातीला किशोर कदम अर्थात सौमित्र भूमिका साकारणार होते. त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने टेन्शन वाढलं. विक्रांतने नंदू माधव यांना विनंती केली आणि ते तयार झाले. आपली कथा कमी कालावधीत प्रभावीपणे मांडण्याचे लघुपट हे परिणामकारक माध्यम आहे, असे विक्रांत रामदास यांनी 'लोकमत'ला सांगितले.
------
'मॅग्नोलिया' अर्थात फुलाचे नाव. तरुणाईच्या दृष्टीने मागे पडत असलेली विवाहसंस्था, त्यांच्या नव्या नात्यांचे अवकाश असे विविधांगी चित्रण उलगडणारा हा लघुपट आहे. लघुपटाची निर्मिती मनोज लोंढे यांची असून प्रस्तुती बार्नोली ब्रदर्स यांची आहे. विक्रांत रामदास यांनी लेखन आणि दिगदर्शन केले आहे.