‘युगनायक शिवराय’ मधून उलगडणार शिवरायांची गौरवगाथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:27 AM2021-02-20T04:27:04+5:302021-02-20T04:27:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राच्या प्रेरणादायी इतिहासातील मेरूमणी! जनमानसावर प्रदीर्घ काळ राज्य करणारा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राच्या प्रेरणादायी इतिहासातील मेरूमणी! जनमानसावर प्रदीर्घ काळ राज्य करणारा हा जगातील एकमेव राजा आहे. लेखक प्रतीक पुरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘युगनायक शिवराय’ या हिंदी गीत चरित्रातून महाराजांच्या जन्मापासून ते देहावसनापर्यंतच्या अमोघ अद्वितीय कर्तृत्वाचा वेध घेतलेला आहे. शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास आजच्या पिढीसमोर सांगीतिक स्वरुपात उलगडण्याचे शिवधनुष्य पेलले आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने या चरित्र कार्यक्रमाची झलक शिवभक्तांपर्यंत पोहोचणार आहे.
‘शूर वीर रणधीर सुधर्मी, सुविचारी शिवराज... देव देश जनहीत रतकर्मी, सदाचारी शिवराज’ अशा शब्दांत ‘युगनायक शिवराय’ यांची गौरवगाथा गुंफण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. निळू फुले अकादमी (सुरेश देशमुख) आणि ऑरोरा प्रोडक्शनची (राहुल लामखेडे) निर्मिती असलेल्या सांगीतिक कार्यक्रमाचे लेखन प्रतीक पुरी, संगीत दिग्दर्शन मयूर मुळे, निवेदन राहुल लामखेडे यांनी केले आहे. ज्ञानेश्वरी पंडित, मानसी भागवत, तन्मय दिग्रसकर, शिवप्रसाद पासलकर, अविनाश केदारी यांनी गीते गायली आहेत. चंद्रकांत चित्ते, कार्तिकस्वामी दहीफळे, मंगेश जोशी यांनी वादनातून कार्यक्रमात अनोखे रंग भरले आहेत.
प्रतीक पुरी म्हणाले, ‘शिवरायांवरील बरेच साहित्य मी लहानपणापासून वेड्यासारखा वाचत आलो आहे. माझ्या जीवनावर त्यांचा खूप मोठा प्रभाव आहे. २००६-२००७ दरम्यान मी शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनाचा परिचय देणारी ३५ गाणी लिहिली. कोरोना काळात हा खजिना मला नव्याने गवसला. काही कलाकारांशी चर्चा केल्यावर त्यांनीही या संकल्पनेला दुजोरा दिला आणि ‘युगनायक शिवराय’ हा कार्यक्रम आकारास आला. दैवतीकरण टाळत महाराजांचे प्रेरणादायी चरित्र उलगडण्याचा प्रयत्न आम्ही यातून केला आहे. कार्यक्रमाचा कालावधी दोन ते सव्वा दोन तासांचा आहे. मी हिंदीत प्रथमच दोन पोवाडे लिहिले आहेत. एक तानाजी मालुसरे यांच्या बलिदानावरचा आहे. दुसरा अफजलखान वधावर आधारित आहे. आजच्या काळातही सुसंगत आणि दिशादर्शक देणारी ही प्रेरणादायी गाथा प्रत्येकाला आपलीशी वाटेल, याची खात्री वाटते.’