अभिवादन यात्रेतून समतावादी विचारांचा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 08:23 PM2018-04-11T20:23:04+5:302018-04-11T20:23:04+5:30
समतावादी विचारांचा जयघोष करत नगारा वदन, ढोलताशा पथक आणि शोभारथाच्या सहाय्याने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन यात्रा काढण्यात आली.
पुणे : समतावादी विचारांचा जयघोष करत नगारा वदन, ढोलताशा पथक आणि शोभारथाच्या साहाय्याने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन यात्रा काढण्यात आली. पाणी आडवा, पाणी जिरवा, स्त्रीभ्रूणहत्या थांबवा, शिक्षणाचा दिवा घरोघरी पेटवा यासारखे सामाजिक संदेश असलेले फलक घेऊन जनजागृती करण्यात आली. आबालवृध्द या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भिडेवाड्यापासून निघालेल्या यात्रेचा गंज पेठेतील महात्मा फुले वाड्यात समारोप झाला.
युवा माळी संघटनेसह राज्यातील विविध माळी समाज संघटनांतर्फे आयोजित या अभिवादन यात्रेचे उदघाटन भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे महाराष्ट्र अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, ज्येष्ठ उद्योजक दीपक कुदळे, माजी आमदार कमल ढोले-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. ही अभिवादन यात्रा भिडेवाडा येथून सुरू होऊन रामेश्वर चौक दत्तमंदिर मार्गे, मंडई, शुक्रवार पेठ, मामलेदार कचेरी, खडकमाळ मार्गे गंजपेठ येथील महात्मा फुले वाडा येथे पोहचली. यात्रेत डॉक्टरांचे पथक, स्वच्छता पथक आणि शालेय विद्यार्थ्यांचे पथक देखील सहभागी झाले होते. पुणे, पिंपरी-चिंचवड,माळीनगर, सासवड, वाई, सातारा, अहमदनगर, नाशिक, जळगाव अशा विविध भागातील माळी संघटना सहभागी झाल्या होत्या. गायत्री लडकत यांनी महात्मा फुले वाडा येथे ‘मी सावित्री फुले बोलतेय’ हा एकपात्री प्रयोग सादर केला.