ग्यानबा-तुकारामाचा जयघोष
By Admin | Published: July 20, 2015 03:31 AM2015-07-20T03:31:50+5:302015-07-20T03:31:50+5:30
अंथुर्णे येथील मुक्कामानंतर संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील लाखो वैष्णवांचा मेळा नागवेलीच्या पानासाठी प्रसिद्ध
निमगाव केतकी : अंथुर्णे येथील मुक्कामानंतर संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील लाखो वैष्णवांचा मेळा नागवेलीच्या पानासाठी प्रसिद्ध असलेल्या इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावात विसावला. ग्रामस्थांनी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले.
पालखी सोहळ्याने सकाळी अंथुर्णे येथून प्रस्थान ठेवले. शेळगाव सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पालखी सोहळ्याने मार्गावरील गोतोंडी गावात विसावा घेतला. तीन तासांच्या विश्रांतीनंतर पालखी सोहळा सायंकाळी निमगाव केतकी येथे दाखल झाला. सुवर्ण युग गणेश मंडळ ट्रस्टच्या वतीने वारकऱ्यांची सेवा करण्यात आली. श्रीसंत सावता माळी चालक मालक संघटनेच्या वतीने अल्पोपहार वाटप करण्यात आले. याशिवाय विविध मंडळांनी सामाजिक उपक्रमासाठी पुढाकार घेतला. इंदापूर तालुका मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट व मुस्लिम युवक संघटनेच्या वतीने वारकरी भाविकांना शिरखुर्मा, फराळासाठी केळी वाटप केली. सायंकाळी उशिरापर्यंत दर्शनासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पालखी सोहळा दाखल झाल्याने गावात ग्यानबा-तुकारामाचा जयघोष सुरू होता. जणू अवघा गाव विठुमय झाला होता. पालखी इंदापूर शहरातील मुक्कामासाठी सोमवारी (दि. २०) सकाळी मार्गस्थ होणार आहे. (वार्ताहर)