अलंकापुरीत ""श्री""ची वैभवी ""रथोत्सव"" मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:27 AM2020-12-13T04:27:12+5:302020-12-13T04:27:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आळंदी : उभारिला ध्वज तीही लोकांवरती ! ऐसा चराचरी कीर्ती ज्यांची !! ...
लोकमत न्यूज नेटवर्क
आळंदी : उभारिला ध्वज तीही लोकांवरती ! ऐसा चराचरी कीर्ती ज्यांची !! ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान ! मुक्ताबाई ज्ञानदीप्तीकळा !!
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२४ व्या संजीवन समाधी सोहळा दिनानिमित्त शनिवारी (दि.१२) अलंकापुरीत ''''श्रीं''''ची वैभवी ''''रथोत्सव'''' मिरवणूक ''''माऊली - माऊली''''च्या जयघोषात मोठ्या उत्साहात पार पडली. ''''श्रीं''''चे दर्शन घेण्यासाठी नगरप्रदक्षिणामार्गावर स्थानिकांनी गर्दी केली होती. उद्या रविवारी (दि.१३) माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे.
माऊलींना पवमान अभिषेक व दुधारती घालून पहाटेच्या सुमारास प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या हस्ते शासकीय पंचोपचार पूजा पार पडली. दुपारी माऊलींना महानैवेद्य देण्यात आला. सायंकाळी चारच्या सुमारास परंपरेनुसार इनामदार कुटुंबीयांच्या वतीने माऊलींची विधिवत पूजा करून माऊलींचा चांदीचा मुखवटा नगरप्रदक्षिणेसाठी सजविलेल्या स्वयंचलित रथात विराजमान करण्यात आला.
वीणा, टाळ - मृदंगांचा निनाद आणि मर्यादित वारकऱ्यांच्या जयघोषात ही ''''रथोत्सव'''' मिरवणूक फुलवाले धर्मशाळा, चाकण चौक, भैराबा चौकमार्गे हजेरी मारुतीपासून मुख्य मंदिराकडे मार्गस्थ झाला. समाधी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला केंदूर (ता. शिरूर) येथील संतश्रेष्ठ श्री. कान्होराज महाराज यांनी मंदिरात कीर्तन केले होते. त्यांची प्रथा व परंपरा आजही केंदूरकरांकडून जपली जात आहे. रात्री नऊ ते अकरा यावेळेत वीणा मंडपात केंदूरकर महाराजांचे कीर्तन पार पडले. रात्री उशिरा श्रींच्या गाभाऱ्यात
देवस्थानच्या वतीने नारळ - प्रसाद वाटून द्वादशीची सांगता करण्यात आली.
चौकट
संजीवन समाधी सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम रविवारी (दि.१३) पहाटे तीनपासून सुरू होणार आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी कार्तिक वैद्य त्रयोदशीला अलंकापुरीत समाधी घेतली होती. गुरुवारी त्याला ७२४ वर्षे पूर्ण होतील. त्यानिमित्त ''''श्रीं''''च्या संजीवन समाधीवर पुष्पवृष्टी, माऊलींच्या मंदिरात घंटानाद, सोहळ्यावर आधारित वीणामंडपात संत नामदेव महाराजांचे वंशज नामदास महाराज यांचे कीर्तन होणार आहे.
आजचे कार्यक्रम
रात्री १२ पासून संजीवन समाधीच्या दिवसाला प्रारंभ.
* पहाटे ३ ते ५ प्रमुख विश्वस्तांच्या हस्ते पवमान अभिषेक व दुधारती. * सकाळी ७ ते ९ हैबतबाबा पायरीपुढे कीर्तन.
* ७.३० ते ९.३० वीणामंडपात कीर्तन.
* सकाळी १० ते दुपारी १२ संजीवन समाधी सोहळ्यावर ह.भ.प. नामदास महाराजांचे कीर्तन.
* दुपारी १२ ते साडेबारा ७२४ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त घंटानाद, पुष्पवृष्टी व आरती, नारळ व प्रसाद.
* दुपारी २ ते ३ श्री. पांडुरंग पादुका भेट
* रात्री ९.३० छबिना
फोटो ओळ : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन सोहळ्यानिमित्त अलंकापुरीत शनीवारी ''''श्रीं''''ची रथोत्सव मिरवणूक पार पडली. (छायाचित्र : भानुदास पऱ्हाड).