प्रमाणपत्रांचा गोरखधंदा
By admin | Published: June 6, 2016 12:29 AM2016-06-06T00:29:00+5:302016-06-06T00:29:00+5:30
निवडणूक महापालिकेची असो की, विधानसभा, लोकसभेची; बनावट कागदपत्र तयार करणारे रॅकेट पिंपरी-चिंचवड शहरात कार्यरत होते. त्याचा प्रत्यय शनिवारी आनंदनगरमध्ये आढळून
पिंपरी : निवडणूक महापालिकेची असो की, विधानसभा, लोकसभेची; बनावट कागदपत्र तयार करणारे रॅकेट पिंपरी-चिंचवड शहरात कार्यरत होते. त्याचा प्रत्यय शनिवारी आनंदनगरमध्ये आढळून आलेल्या विविध प्रकारच्या बनावट प्रमाणपत्रांमुळे आला. याबाबत ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने स्टिंग आॅपरेशन केले असता कोणत्याही शासकीय कार्यालयात रीतसर कागदपत्र जोडून अर्ज दाखल न करता, घरच्या घरी तयार केलेली बनावट प्रमाणपत्र वितरित केली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.
बनावट प्रमाणपत्र केवळ पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर परिसरातील कार्यालयांचे नाही, तर राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील प्रमाणपत्र एजंटकडून तयार करून दिले जाते. जात प्रमाणपत्र अथवा जात पडताळणी प्रमाणपत्राबद्दल कोणी आक्षेप घेतला, तरच सखोल चौकशी होऊन त्यावर निर्णय घेतला जातो. अन्य ठिकाणी तर सर्रास अशा बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे सवलतींचा लाभ उठविला जात आहे. बनावट प्रमाणपत्र तयार करणारे काही ठग पोलिसांच्या जाळ्यात अडकले जात असले, तरी त्यांचा बोलविता धनी कोणीतरी वेगळाच असतो. राजकीय पुढाऱ्यांपैकी काहीजण असे उद्योग करून पुढील निवडणुकीची तयारी करीत असल्याची चर्चा आहे. महापालिका निवडणूक जवळ येऊ लागल्याने बनावट प्रमाणपत्र, तसेच अन्य कागदपत्र तयार करणारे रॅकेट सक्रिय झाले आहे.
बनावट जात प्रमाणपत्र दाखल करून महापालिकेची निवडणूक लढविण्याचे अनेक प्रकार शहरात घडले आहेत. जात दाखले, तसेच जात प्रमाणपत्र अवैध असल्याचे उघडकीस आल्यानंतर नगरसेवकपद रद्द झाल्याच्या घटना घडल्या आहेत. असे असताना, या प्रकारावर नियंत्रण आणण्यात शासकीय यंत्रणेला यश आलेले नाही.
शाळेच्या दाखल्यापासून, उत्पन्न दाखला, जन्म-मृत्यूनोंदणी, जात प्रमाणपत्र अशी महत्त्वाची प्रमाणपत्रे सहज मिळू लागली आहेत. २००९ मध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्या वेळी गांधीनगर झोपडपट्टीत एका कार्यकर्त्याकडे हजारोंच्या संख्येने रेशनकार्ड आढळून आली. घरच्या घरी बनावट रेशनकार्ड तयार करून बोगस मतदानासाठी ती वापरण्याचे
नियोजन होते. (प्रतिनिधी)
सूत्रधाराला उस्मानाबादमध्ये अटक
चिंचवड पोलिसांनी सापळा रचून शनिवारी बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्या दिनकर लिंबाजी म्हस्के (वय ४९, रा. आनंदनगर, चिंचवड) या आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या कार्यालयात बनावट प्रमाणपत्रांचा ढीग आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, या प्रकरणातील सूत्रधार बनसोडे याला उस्मानाबाद पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले आहे. म्हस्के याच्या कार्यालयातून लॅपटॉप, विविध कार्यालयांचे शिक्के, तसेच छापील प्रमाणपत्र असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. कार्यालयात सुमारे ४०० दाखले आढळून आले. आणखी किती बनावट प्रमाणपत्र वितरित केली याचा तपास पोलीस करत आहेत.
शिक्के कोठून मिळविले ?
बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्यांचे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दिनकर म्हस्के याच्या आनंदनगर कार्यालयात विविध शासकीय कार्यालयांचे रबरी शिक्के आढळून आले. ते शिक्के त्यांनी कसे तयार केले, कोणाकडून तयार करून घेतले, याचाही शोध पोलीस घेत आहेत. बनावट प्रमाणपत्र तयार करून देणाऱ्यांचा गोरखधंदा अनेक दिवसांपासून राजरोसपणे सुरू आहे. ज्यांनी अशा एजंटांकडून दाखले घेतले असतील, ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.