'चले जाओ, चले जाओ अमित शाह चले जाओ',महापुरुषांच्या अवमानाचा निषेध नोंदवत पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 12:58 PM2021-12-19T12:58:56+5:302021-12-19T13:11:18+5:30

प्रत्यक्षात चौकाचौकात लावलेल्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न लावता अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या अनेक किरकोळ नेत्यांचे फोटो लावण्यात आले.

Go away go away Amit Shah go away NCP agitates in pune | 'चले जाओ, चले जाओ अमित शाह चले जाओ',महापुरुषांच्या अवमानाचा निषेध नोंदवत पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

'चले जाओ, चले जाओ अमित शाह चले जाओ',महापुरुषांच्या अवमानाचा निषेध नोंदवत पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

Next

पुणे : अवघ्या देशाचे आराध्य दैवत, महाराष्ट्राची अस्मिता युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची भाजपची सत्ता असलेल्या कर्नाटक राज्यात विटंबना करण्यात आली. भाजप नेते अमित शहा यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी पुणे महानगरपालिकेत आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा गैरवापर करण्यात आला. प्रत्यक्षात चौकाचौकात लावलेल्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न लावता अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या अनेक किरकोळ नेत्यांचे फोटो लावण्यात आले. जिथे संधी मिळेल तिथे महापुरुषांचा जाणूनबुजून अवमान करण्याचे भारतीय जनता पक्षाचे हे धोरण आहे, याविरोधात निषेध नोंदवण्यासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज जंगली महाराज रस्त्यावरील झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याजवळ तीव्र आंदोलन करण्यात आले. 

यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून वंदन करण्यात आले. कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली, याबद्दल प्रतिक्रिया देताना ही घटना "किरकोळ" आहे असे वक्तव्य भाजप नेते व कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले. अवघ्या महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय आहेत, छत्रपतींच्या अवमानाची घटना आज भारतीय जनता पक्षाला "किरकोळ" वाटत आहे. महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी याचे चोख प्रत्युत्तर मतपेटीच्या माध्यमातून निश्चितच देतील. येत्या काळात या शिवद्रोही भाजपचे महाराष्ट्रातील अस्तित्व 'किरकोळ' झाल्याशिवाय शिवप्रेमी शांत बसणार नाही.

 ''नरेंद्र मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना करणे, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक भाषा वापरणे यांसारखे अनेक प्रकार यापूर्वीही भाजपकडून करण्यात आले आहेत. यावरूनच भाजपचे शिवप्रेम किती खोटे आणि दिखाऊ आहे हे सिद्ध होते. आताही कर्नाटकातील घटनेबद्दल राज्यातील सर्व भाजप नेते मूग गिळून बसले आहेत. देवेंद्र फडणवीस यांची छत्रपती शिवाजी महाराजांवर खरी श्रद्धा असती तर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा निषेध केला असता, परंतु त्यांनी तसे केले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानापेक्षा फडनवीसांना त्यांची पक्षनिष्ठा महत्वाची वाटली अशी भावना यावेळी प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.'' 

Web Title: Go away go away Amit Shah go away NCP agitates in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.