मराठीच्या अभिजात दर्जासाठी न्यायालयात जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 02:36 AM2018-08-30T02:36:31+5:302018-08-30T02:36:56+5:30

मसापच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय : मुख्यमंत्र्यांनी साहित्यिकांसह पंतप्रधानांची भेट घेण्याची मागणी

Go to court for Marathi's classical status | मराठीच्या अभिजात दर्जासाठी न्यायालयात जाणार

मराठीच्या अभिजात दर्जासाठी न्यायालयात जाणार

Next

पुणे : बडोद्याच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषेला अभिजातचा दर्जा मिळण्याच्यादृष्टीने साहित्यिकांचे शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांची भेट घेण्याचे आश्वासन दिले होते. नोव्हेंबरअखेरपर्यंत मुख्यमंत्र्यांनी ‘अभिजात’साठी साहित्यिकांच्या शिष्टमंडळासह पंतप्रधानांची भेट न घेतल्यास समविचारी संस्था आणि व्यक्तींच्या सहयोगाने ‘अभिजात’ दर्जासाठी न्यायालयात जाण्याचा निर्णय महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण झाली. प्रारंभी वर्षभरात साहित्य, चित्रपट, नाट्य, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील ज्या व्यक्तींचे निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रा. मिलिंद जोशी यांनी वर्षभराच्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. सुनीताराजे पवार यांनी उत्पन्न खर्च व आर्थिक ताळेबंद सादर केला. परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, उपाध्यक्षा निर्मला ठोकळ, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्षा सुनीताराजे पवार
या वेळी उपस्थित होत्या. त्यापूर्वी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत परिषदेच्या चाकण शाखेला मान्यता देण्यात आली.

मराठी वाङ्मय इतिहासाच्या आठव्या खंडाची निर्मिती करण्याच्या प्रस्तावास सभेने मंजुरी दिली. या खंडासाठी २००१ ते २०२५ असा कालखंड घेण्यात येणार असून परिषदेच्या संशोधन विभागप्रमुख डॉ. अरुणा ढेरे या खंडाचे संपादन करणार आहेत. आधुनिक महाराष्ट्राचे वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षात गदिमांचे स्मारक व्हावे, यासाठी साहित्यिकांची एकजूट करून लोकचळवळ उभी केली जाणार आहे. यासंदर्भात लेखकांची बैठक लवकरच घेतली जाणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेला टिळक रस्त्यावरील जागा, इमारत उभारण्यासाठी उदार मनाने औदार्य दाखविणारे औंध संस्थानचे बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या शतकोत्तर सुवर्णजयंतीनिमित्त लवकरच परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात त्यांचे तैलचित्र समारंभपूर्वक लावण्यात येणार आहे.

वार्षिक सभेला अध्यक्ष अनुपस्थित
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या सोयीनुसारच वार्षिक सर्वसाधारण सभा निश्चित करण्यात आली होती. मात्र, काही अपरिहार्य कारणांमुळे मी सभेस उपस्थित राहू शकत नसल्याचे कसबे यांनी पत्राद्वारे कळवून सभेची दिलगिरी व्यक्त केली. त्यांच्या अनुपस्थितीत चंद्रकांत शेवाळे यांनी अध्यक्षपद भूषविले. परिषदेच्या १५ हजार आजीव सभासदांपैकी जेमतेम ७० सभासद सभेस उपस्थित होते.

चर्चेविनाच गुंडाळली सभा

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सुमारे १५ हजार सदस्य असताना केवळ ५० सदस्यांच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभा पार पडली. सभेला सदस्यांपेक्षा १४ जिल्ह्यांतील शाखांचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यच अधिक असल्याने एकाही प्रस्तावावर सविस्तर चर्चा झाली नाही. उलट पदाधिकाऱ्यांनी एखाद्या प्रस्तावाचा उल्लेख करताच उपस्थित त्यास आधीच मंजुरी देत होते. त्यामुळे चर्चेविनाच बुधवारी सभा गुंडाळण्यात आली.

सभेच्या प्रारंभीच उपस्थितांनी पदाधिकाºयांना महत्त्वाचे मुद्दे मांडण्याची सूचना केली. पदाधिकारी संबंधित विषयातील महत्त्वाच्या मुद्यावर बोलत असताना उपस्थित तुम्ही सांगत असलेल्या गोष्टी कार्यवृत्तात आल्या आहेत. त्यामुळे त्याव्यतिरिक्त काही असेल तेवढेच मांडण्याची वेळोवेळी सूचना करीत होते. त्यामुळे पदाधिकाºयांनी प्रस्ताव वाचनाला सुरुवात करताच वाचन पूर्ण होण्याआधीच त्यास मंजुरी देत होते. त्यामुळे ठरवूनच संभा गुंडाळली जात असल्याची कुजबुज उपस्थितांतील काही सदस्यांत सुरू होती. संपूर्ण सभेत एकाही उपस्थितांनी एकही प्रश्न उपस्थित केला नाही. सभेला सदस्यांची उपस्थिती नसल्याने अवघ्या तासाभरात सभा संपली.

सभेतील महत्त्वाचे निर्णय
४मराठी वाङ्मय इतिहासाच्या आठव्या खंडाची निर्मिती
४गदिमा स्मारकासाठी साहित्यिकांची एकजूट आणि लोकचळवळ उभी करणार
४शतकोत्तर सुवर्णजयंतीनिमित्त औंध संस्थानिक पटवर्धन यांचे सभागृहात तैलचित्र लावणार.
४शाहूपुरी शाखा (जि. सातारा) करणार मसापचा माहितीपट
४पुल आणि गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम.
४कविता, कथा, कादंबरी तसेच ब्लॉगलेखन आणि अनुवाद व साहित्य संशोधन कार्यशाळा घेणार.
४चाकण शाखेला मान्यता.

Web Title: Go to court for Marathi's classical status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.