कबुतर जा जा, म्हणण्याची वेळ! पिंसासह विष्ठेतील जंतुमुळे पसरतायेत आजार
By श्रीकिशन काळे | Published: December 3, 2024 04:22 PM2024-12-03T16:22:44+5:302024-12-03T16:24:32+5:30
हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनिया या आजाराचे प्रमाण ६० ते ६५ टक्के असून, नागरिकांनी कबुतरांना उघड्यावर मोठ्या प्रमाणावर अन्नपदार्थ टाकू नये, असे आवाहन करण्यात येत आहे
पुणे : कबुतरांच्या पिंसासह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतुमुळे ‘हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनियाचा आजार होत असून, हा फुप्फुसाशी संबंधित आहे. हा आजार होण्याचे प्रमाण ६० ते ६५ टक्के असून, नागरिकांनी कबुतरांना उघड्यावर मोठ्या प्रमाणावर अन्नपदार्थ टाकू नये, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. ‘कबूतर...जा...जा !’ असे म्हणण्याची पाळी पुणेकरांवर आली आहे.
सध्या शहरामध्ये अनेक भागात कबुतरांची वसतीस्थाने झाली आहेत. तसेच इमारतीमध्येही कबुतरांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी एकत्र खूप प्रमाणात खायला दिले जात असल्याने कबुतरांची संख्या वाढते आहे. परंतु, कबुतरांमुळे आजार पसरतात, याविषयी खूप जनजागृती झालेली नाही.
वाळलेल्या कबुतराची विष्ठा आणि सूक्ष्म पिसांमधून धूळ किंवा कण श्वासोच्छवासाद्वारे फुफ्फुसामध्ये जातात. त्यामुळे श्वासोच्छवासाच्या समस्या उद्भवू शकतात. प्रामुख्याने ज्यांना अस्थमा किंवा ॲलर्जी असलेल्या रुग्णांना त्याचा खूप त्रास होऊ शकतो. अशा रूग्णांनी काळजी घेणे आवश्यक आहे. जर रूग्ण कबुतराच्या विष्ठेच्या संपर्कात आल्यास संसर्ग होण्याचा धोका असतो. विशेषत: जर विष्ठा उघड्या जखमा किंवा श्लेष्मल (संवेदनशील) त्वचेच्या संपर्कात आल्यास त्याचे संक्रमण वेगाने होते. अतिसंवेदनशील न्यूमोनायटिस हा फुफ्फुसातील एक दाहक आजार आहे, जो पक्ष्यांच्या विष्ठेतील सेंद्रिय धुळी कणांच्या वारंवार श्वासोच्छवासाने होतो.
इमारतींच्या गॅलरीमध्ये कबुतरं विष्ठा करतात. त्या वाळलेल्या विष्ठेची सफाई करताना त्याचे सूक्ष्म धुळीत रूपांतर होते, तेव्हा ते धूळ कण हवेत जातात. या कणांमध्ये विविध बुरशीचे बीजाणू, जीवाणू आणि इतर सेंद्रिय पदार्थ असतात, जे मानवी शरीराला अपायकारक असतात. विष्ठेमुळे अनेकदा खोकला, श्वास लागणे, ताप आणि थकवा येऊ शकतो.
उपाय काय कराल ?
कबुतराच्या पिसांनी आणि विष्ठेमुळे दूषित झालेल्या भागाशी संपर्क येऊ देऊ नका. तोंडाला कपडा बांधून विष्ठा काढा किंवा संरक्षक उपकरणे घालावे. प्रभावित भाग योग्यरित्या स्वच्छ करून निर्जंतुक करावा. जर त्याच्या संपर्कामुळे आरोग्य समस्या निर्माण झाली तर वैद्यकीय सल्ला घ्यावा.
हा उपाय करावा !
मोठमोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कबुतरांचा उपद्रव होत असतो. त्यामुळे अनेकजण खिडक्यांना, गॅलरीमध्ये जाळ्या लावून घेतात. त्यामुळे कबुतरे त्या ठिकाणी येत नाहीत. अनेक ‘एसी’वर बसून कबुतरे विष्ठा टाकतात. ते देखील त्रासदायक ठरते.
महापालिकेकडून फलक !
कबुतरांचा त्रास वाढून त्यामुळे शहरामध्ये फुप्फुसासंबंधीचे आजार ६० ते ६५ टक्के असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे नागरिकांनी उघड्यावर व इमारतीमध्ये कबुतरांना खायला देऊ नये, असे आवाहन महापालिकेने फलक लावून केले आहे.
कबुतरांच्या विष्ठेमध्ये जंतु असतात. त्यामुळे त्यापासून जंतुसंसर्ग पसरू शकतो. पुण्यामध्ये या कबुतरांचा त्रास आहे. एकाच ठिकाणी खूप अन्नपदार्थ खायला टाकले की, तिथे मोठ्या प्रमाणावर कबुतरं येतात. यांच्या विष्ठेमुळे दमा, अस्थमा, ॲलर्जी असणाऱ्यांना त्रास होतो. त्यांनी काळजी घ्यावी. -डॉ. सुचित्रा सूर्यवंशी-पाटील, पशूवैद्यकीय अधिकारी, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय