ट्रायल रूममध्ये जाताय; राहा सावध!
By admin | Published: April 9, 2015 05:17 AM2015-04-09T05:17:10+5:302015-04-09T05:17:10+5:30
शहरात नावाजलेले आणि प्रशस्त आकारातील सुमारे २५ ते ३० शॉपिंग मॉल. प्रवेशद्वारापासून मॉलमधील प्रत्येक दालनात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे
पिंपरी : शहरात नावाजलेले आणि प्रशस्त आकारातील सुमारे २५ ते ३० शॉपिंग मॉल. प्रवेशद्वारापासून मॉलमधील प्रत्येक दालनात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे. दक्षता म्हणून ट्रायल रुम (कपडे घालून पाहण्याची खोली) शेजारी सुरक्षारक्षक उभाच... मात्र, काही ट्रायल रूमची बांधणी अशी आहे की, रूममधील व्यक्तीचे आजूबाजूच्या परिसरातून मोबाईलद्वारे सहजपणे चित्रीकरण करता येणे शक्य होते.
सुरक्षेच्या दृष्टीने आणि वस्तू चोरीस जाऊ नये यासाठी मॉलच्या व्यवस्थापनाने सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. मॉलच्या प्रवेशद्वारातील तपासणी कक्षात, संपूर्ण दालनात, जिना, बिलिंग कक्ष, बाहेर पडण्याचे द्वार, वाहनतळ, स्टोअर रूम, व्यवस्थापन कक्ष आदी भागांत कॅमेरे लावले गेले होते. मॉलमध्ये
प्रवेश करण्यापासून, खरेदी आणि मॉलमधून बाहेर पडेपर्यंत प्रत्येक नागरिकावर नजर ठेवण्यासाठी कोपऱ्या-कोपऱ्यांत कॅमेरे रोखले आहेत. कॅमेऱ्याचा रंग दालनातील रंगाशी मिळता-जुळता असल्याने, तसेच त्याचा आकार छोटा असल्याने ते सहज दृष्टीस पडत नाहीत.
सर्वच मॉलमध्ये लहानापासून मोठ्यांपर्यंत कपडे विक्रीस आहेत. हे कपडे फिटिंगला व्यवस्थित येतात का? आणि शोभून दिसतात का? हे पाहण्यासाठी ट्रायल रूमची सोय केलेली असते.
महिला व पुरुष अशा वेगवेगळ्या ट्रायल रूमची व्यवस्था सर्वच मॉलमध्ये होती. ट्रायल रूमच्या शेजारी विशेषत: महिलांच्या शेजारी सुरक्षारक्षक नेमले होते. काही मॉलमधील महिला ट्रायल रूमशेजारी पुरुष सुरक्षारक्षक तैनात असल्याचे चित्र होते. सुरक्षारक्षक असल्याने छुप्या पद्धतीने चित्रीकरण करण्याची शक्यता कमी वाटते. मात्र, सर्वच ट्रायल रूमशेजारी सुरक्षारक्षक नव्हते. त्यामुळे छुप्या पद्धतीने चित्रीकरण करता येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काही मॉलच्या ट्रायल रूमला खालच्या बाजूने फट दिसून येत होती. त्यामुळे या फटीतून सहजपणे चित्रीकरण करण्याचा धोका स्पष्ट जाणवत होता. हे रूम पुरुषासाठी होते. गर्दीच्या वेळेत ट्रायल रूमभोवती ग्राहकांची रांग लागते. हातात कपडे घेऊन रूमभोवती ते उभे असतात. रूमच्या शेजारीच उभे असल्याने मोबाईलने छुप्या पद्धतीने चित्रीकरण करणे सहजशक्य आहे. ट्रायल रूममध्ये डोकावता येऊ नये म्हणून त्या भोवती अधिक उंचीची सुरक्षा भिंत असावी. याकडे मात्र अनेक मॉलमध्ये साफ दुर्लक्ष केले आहे.