ध्येयनिष्ठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 04:08 AM2018-04-03T04:08:51+5:302018-04-03T04:08:51+5:30
खादीचा झब्बा, पायजमा, पांढरेशुभ्र केस. बेताचीच उंची. मात्र, वैचारिक उंची कितीतरी मोठी असल्याचे पुरावे बोलताना शब्दाशब्दांत मिळतात. भाई वैद्य नावाचा हा साधासुधा माणूस ध्येयासाठी, विचारांसाठी सर्वस्वावर पाणी सोडण्यास मागंपुढं पाहणार नाही, याची खात्रीच त्यातून पटते.
राज्याचं गृहमंत्रिपद हातात, फक्त एक स्वाक्षरी करायची. किंमत ३ लाख रुपये ! ३० वर्षांपूर्वींचे. कोणाला मोह पडणार नाही?
भाई वैद्य नावाच्या एका माणसाला नाही पडला. त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला फोन लावला. सगळ्या व्यवहारांची कल्पना दिली आणि सापळा लागला. मंत्र्याला लाच देऊ पाहणाऱ्यांचा पर्दाफाश झाला. काही तस्करांना सोडून देण्याची भानगड होती. जिवाला धोका होता, तत्कालीन पोलीस अधिका-यांनी तशी कल्पना दिली होती; मात्र भार्इंनी त्याची फिकीर केली नाही.
काय वाटलं भाई त्या वेळी?, असा प्रश्न आल्यावर भार्इंच्या तोंडावर फक्त एक निर्व्याज हसू फुलतं. ‘आईवडिलांच्या, राष्ट्रसेवा दलाच्या संस्काराचा हा परिणाम’, एवढंच ते सांगतात आणि पुढं दुसराच विषय काढून त्यावर बोलू लागतात. भार्इंनी त्या वेळीही या प्रकाराचं राजकीय भांडवल केलं नाही व आताही करत नाहीत. वाटचाल भ्रष्ट असली की ध्येय अंधूक होतं, असं त्यांचं सांगणं. हे ध्येय म्हणजे लोकशाही समाजवाद आणण्याचं.
भार्इंच्या चळवळ्या आयुष्याची सुरूवात १९४२ची चळवळ सुरू झाली तेव्हाच झाली. शिवाजी मराठा हायस्कूलचा एक विद्यार्थी या चळवळीत होता. त्याला पोलिसांनी पकडलं. त्यानंतर इयत्ता आठवीत असलेल्या भार्इंकडे हायस्कूलचं नेतृत्व आलं. नेत्यांचे निरोप पोहोचवण्याबरोबरच हरताळ करणं, प्रभातफेºया काढणं अशी कामं सुरू झाली. दरम्यानच्या काळात राष्ट्र सेवा दलाची स्थापना झाली. भार्इंनी या संघटनेची गुरूवार पेठेतील जबाबदारी स्वीकारली. युवकांना जमा करणं, त्यांची बौद्धिकं आयोजित करणं, यातून त्यांचा त्या वेळच्या मोठ्या नेत्यांबरोबर संपर्क येत गेला. सेवा दलाचे ते शाखानायक झाले. महात्मा गांधी सन १९४५ मध्ये पुण्यात आले. सेवा दलाचा शाखानायक या नात्यानं भार्इंवर गांधींजीबरोबर राहायची जबाबदारी देण्यात आली. ‘मंतरलेले दिवस’ अशा शब्दांत भाई त्या दिवसांचं वर्णन करतात. गांधींजींचं राहणं, वागणं, बोलणं, चालणं यांचा जबरदस्त प्रभाव त्यांच्यावर पडला. याच काळात शालेय शिक्षण संपवून त्यांनी फर्गसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे ग. प्र. प्रधान यांचा सहवास मिळाला. ते सेवा दलाची बौद्धिकं घेत. वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी भाई काँग्रेस सोशॅलिस्ट पार्टीचे सक्रिय सदस्य झाले.
सन १९४७ मध्ये सेवा दल काँग्रेसपासून वेगळं झालं. जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया बाहेर पडले. मग १९५२ ला पुन्हा लोहिया जेपींपासून वेगळे झाले. भाई या सर्व गोष्टी पाहत होते. त्यांनी विचारांशी असलेली निष्ठा कायम ठेवली. एस. एम. जोशी वगैरेंबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. सेवा दलाच्या कामात जीव ओतला. संघटन प्रबळ केलं. शाखा सुरू केल्या. त्याच काळात सुरू झालेल्या गोवा मुक्ती संग्रामालाही त्यांनी वाहून घेतलं. ना. ग. गोरे, शिरूभाऊ लिमये यांच्याबरोबर त्यांनीही या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. गोव्यात सत्याग्रहासाठी जाणाºया एका तुकडीचं नेतृत्व केलं.संयुक्त महाराष्ट्र चळवळीला लोकचळवळ बनवण्याचं सगळं श्रेय एस. एम. यांचंच आहे, असं भाई आवर्जून सांगतात. हिंसेचा स्पर्शही त्यांनी या चळवळीला होऊ दिला नाही. १९५७ ला निवडणूक झाली. एस. एम. उमेदवार व त्यांचे प्रचारप्रमुख भाई. सभा, त्याचं नियोजन, कोणी काय, कोणत्या विषयावर बोलायचं हं सारं भाई बघत. चांगल्या मतांनी एस. एम. निवडून आले. संयुक्त महाराष्ट्रानंतर मुख्यमंत्री यशंवतराव चव्हाण यांनी समाजवादी नेत्यांवर गळ टाकायला सुरूवात केली. काही जण त्यात फसले. आमिषांना नकार देणाºयांत भाई पहिले होते. सन १९६२ मध्ये भार्इंना नेते व कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे निवडणुकीच्या राजकारणात पडावं लागलं. नगरसेवक म्हणून ते निवडून आले. त्यानंतर काही काळातच चीनबरोबर युद्ध सुरू झालं. भार्इंनी राष्ट्रीय युवक संरक्षण समिती स्थापन केली. भाई तिचे अध्यक्ष. सरचिटणीस कोणाला करायचं, असा प्रश्न निर्माण झाला. युवकांमध्ये लोकप्रिय असलेल्या एका चळवळ्या तरुणाचं नाव भार्इंनी सुचवलं. तेच आताचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. या समितीच्या वतीने चिनी आक्रमकांच्या विरोधात युवकांचा मोठा मोर्चा काढण्यात आला.
१९७४ मध्ये ते महापौर झाले. अखिल भारतीय महापौर परिषदेचं अधिवेशन त्यांनी पुण्यात घेतलं व यशस्वी करून दाखवलं. त्याच वेळी एक मोठी चळवळ त्यांची वाट पाहत होती. २६ जून १९७५ ला आणीबाणी जाहीर झाली. त्यापूर्वीच जे.पीं.नी बिहारमध्ये सुरू केलेल्या आंदोलनाला मदत म्हणून भार्इंनी पु्ण्यात ‘बिहार संघर्ष साहाय्य समिती’ची स्थापना केली होती. आणीबाणीच्या विरोधात भार्इंनी तब्बल २५ हजारांची सभा त्याच दिवशी सायंकाळी शनिवारवाड्यावर घेतली. आणीबाणीच्या विरोधातील देशामधील ही पहिलीच सभा. त्यानंतर सगळीकडे सेन्सॉरच लागू झालं. लगेचच भार्इंना व अनेकांना अटक झाली. महापौर असताना अशी अटक झालेले भाई पहिलेच.
आणीबाणीनंतरच्या राजकारणात भार्इंनी जनता पक्षात जाणं स्वाभाविकच होतं. विधानसभेच्या निवडणुकीत ते भवानी पेठ मतदारसंघातून निवडून आले. नंतरच्या राजकीय पडझडीत पुलोदच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे गृहमंत्रिपद आलं. नंतर जनता पक्ष फुटला. विचारांशी निष्ठा असलेल्या भार्इंना हे सगळं अर्थातच पाहवत नव्हतं. त्यांनी नेत्यांना बोलावून सांगितलं, जी पार्टी लोकशाही समाजवादी नाही त्यात अखेरचा श्वास घेण्याची माझी इच्छा नाही, असे स्पष्ट बोलून त्यांनी पार्टी सोडली. जे. पी. लोहिया यांच्या सोशॅलिस्ट पार्टीचं पुनरूज्जीवन करण्याचा काहींचा निर्णय झाला. माजी न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर यांच्या साह्यानंं भार्इंनी तो पूर्णत्वास नेला. २८ मे २०११ ला त्यांनी हैदराबाद येथे सोशॅलिस्ट पार्टी (इंडिया) या पक्षाची स्थापना केली. भार्इंंनाच त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष नियुक्त करण्यात आले. रशियाच्या विघटनामुळं मार्क्सवाद संपला. आता जगातील जमातवाद व भांडवलशाहीसुद्धा लवकरच संपुष्टात येईल. त्यामुळे लोकशाही समाजवाद हाच विचार अंती शिल्लक राहणार आहे, यावर भार्इंचा ठाम विश्वास होता.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारच्या वतीने आकाशवाणीवरून भाषण केलं. ते भाषण ऐकणारा मी एक आहे, असे भाई सांगतात. गांधीजींना ‘राष्ट्रपिता’ हा शब्द त्या भाषणात सुभाषचंद्र यांनी प्रथमच वापरला. तुम्हाला स्वातंत्र्य अर्पण करण्यासाठी आम्ही लवकरच येत आहोत, असे ते म्हणाले असल्याची आठवण आहे. पण, मराठवाडा विद्यापीठाच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ अशा नामांतराच्या ठरावाचे विधेयक विधानसभेत भार्इंनीच सर्वप्रथम मांडले. मंत्री झाल्यावर आई-वडिलांनाही न भेटता ते थेट मराठवाड्यात गेले व तिथे त्यांनी नामांतर कसे आवश्यक आहे व ते होणारच, अशी ठाम भूमिका जाहीरपणे मांडली.
‘लोकमत’च्या ‘प्रथम पुरुषी’ पुरवणीत भाई वैद्य यांच्या राजू इनामदार यांनी घेतलेल्या मुलाखतीचा संपादित अंश.