रस्त्यावर भरवला बोकडांचा बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:08 AM2021-07-12T04:08:37+5:302021-07-12T04:08:37+5:30
चाकणमधील गुरांचा बाजार शनिवारी (दि. १० जुलै) बंद ठेवण्यात आला होता. अचानक बाजार बंद ठेवण्यात आल्याने व पशुपालक ...
चाकणमधील गुरांचा बाजार शनिवारी (दि. १० जुलै) बंद ठेवण्यात आला होता. अचानक बाजार बंद ठेवण्यात आल्याने व पशुपालक शेतकऱ्यांना याची कल्पना नसल्याने अनेकांनी नेहमीप्रमाणे गुरे विक्रीसाठी आणली होती. मात्र, येथील बाजारात आल्यानंतर गुरांचा बाजार बंद असल्याची माहिती मिळाल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यातच मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण दहा- बारा दिवसांवर आला आहे. त्यामुळे येथील बाजारात खूप मोठ्या प्रमाणावर बोकड विक्रीसाठी शनिवारी आणण्यात आले होते.मात्र बाजार बंद असल्याने अनेकांनी बाजार समितीच्या रोहकल रस्त्यावरील बाजाराच्या बाहेर चक्क रस्त्यावरच जनावरांची खरेदी विक्रीचा बाजार भरवला होता.यात खूप मोठ्या प्रमाणावर बोकडांची खरेदी विक्री झाली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कसल्याही प्रकारचे धार्मिक कार्यक्रम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बकरी ईदचा सण आठवड्याभराच्या जवळ आला आहे. यामुळे गर्दी होऊ नये यासाठी राज्य शासनाने जनावरांचा बाजार बंद ठेवण्यात यावा असे पत्र खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीला दिले आहे.त्यानुसार बाजार बंद ठेवण्यात आला होता.मात्र याची माहिती पशुपालक शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना मिळाली नाही. संपूर्ण रोहकल रस्त्यावर सकाळपासून दुपारपर्यंत मोठी वाहतूककोंडी आणि नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.
शासनाच्या नियमांनुसार जनावरांचा बाजार बंद ठेवण्यात आला होता.बकरी ईदमुळे वर्षभर पालन केलेल्या बोकडांची विक्री व खरेदीसाठी लोक मोठ्या संख्येने आली होती.बोकडांची खरेदी-विक्री ऑनलाईन करावी असे म्हणणे शासनाचे आहे.मात्र ते शक्य नाही.
विनायक घुमटकर,सभापती, खेड तालुका बाजार समिती.
चाकणला रस्त्यावर भरलेल्या बोकडांचा बाजारातील गर्दी.