पाण्यासाठी शेळीचे लग्न बोकडाशी, अनोख्या पद्धतीने केला शासनाचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 02:05 IST2019-02-04T02:04:09+5:302019-02-04T02:05:11+5:30
कडेपठार (ता. बारामती) येथील आंदोलनात आज चौथ्या दिवशी चक्क बोकड व शेळीचे मोठ्या थाटामाटात लग्न लावून सरकारचा निषेध करण्यात आला

पाण्यासाठी शेळीचे लग्न बोकडाशी, अनोख्या पद्धतीने केला शासनाचा निषेध
सुपे : जनाई शिरसाई उपसा जलसिंचन योजनेचे पाणी बारामतीच्या दुष्काळी भागाला मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या उंडवडी कडेपठार (ता. बारामती) येथील आंदोलनात आज चौथ्या दिवशी चक्क बोकड व शेळीचे मोठ्या थाटामाटात लग्न लावून सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी जमा झालेला ६८७ रूपयांचा आहेर सरकारला पाठवण्यात येणार आहे.
जनाई शिरसाईच्या पाण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी चक्री उपोषण वेगवेगळ्या पद्धतीने सुरू ठेवले आहे. या आंदोलनाची सरकार दखल घेत नसल्याने चौथ्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी चक्क शेळी आणि बोकड यांचा शुभविवाह लावून आगळेवेगळे आंदोलन केले. ग्रामीण भागात जसा एकदा लग्नसोहळा पार पडतो, तशाच पद्धतीने हा शेळी - बोकडाचा विवाहसोहळा पार पडला. या वेळी जमलेल्या लोकांना या लग्नासाठी अक्षदा वाटप करण्यात आल्या होत्या. बोकड आणि शेळीला बाशिंग आणि मंडवळ्या बांधून दोघांमध्ये (धोती) आंतरपाठ धरुन खास शैलीत पाच मंगलाष्टका म्हटल्या गेल्या. त्यानंतर उपस्थितांनी सुमारे ६८७ रुपये आहेर या विवाहसोहळ्यासाठी केला. या लग्नात ग्रामस्थांनी केलेला पैसेरुपी आहेर (६८७ रुपये) पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना पाठवण्यात येणार आहे. जोपर्यंत योजनेचे पाणी सोडण्यात येत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची माहिती उपोषणकर्ते सतीश जराड व गजानन सरक यांनी दिली. बारामतीच्या जिरायती पट्ट्यात पाणी सोडण्यासंदर्भात सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. तसेच, येथे सुरू असलेल्या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याने उपोषणकर्त्यांनी चौथ्या दिवशी मुक्या प्राण्यांचे लग्न लावून सरकारचा निषेध केला.
रविवारी (दि. ३) या भागाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपोषणस्थळी भेट दिली. या वेळी उपोषणकर्त्यांशी संवाद साधून माहिती घेतली. या वेळी सभापती संजय भोसले, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, दूध संघाचे संचालक अप्प्पासो शेळके, संजय गाडेकर, वैशाली साळुंके, सरपंच विशाल कोकरे, कल्पना साळुंके, उपसरपंच पोपट गवळी, माजी सरपंच विठ्ठल जराड, बापूराव गवळी आदींसह महिला ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.