देव आले देवाला भेटायला...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 12:00 PM2019-03-22T12:00:25+5:302019-03-22T12:02:12+5:30
आपल्या घरातील मारुतीचे टाक घेऊन वीर मारुती मंदिरातील हनुमानरायाची भेट घडवून आणण्यासाठी गुरुवारी एकच गर्दी झाली होती़.
पुणे : उत्तर भारतातील विजयानंतर पेशव्यांना भेटीसाठी येण्यापूर्वी विजयी सरदार, वीर शनिवार पेठेतील वीर मारुती मंदिरात एकत्र येऊन मारुतीचे दर्शन घेत व तेथे जमून ते पेशव्यांच्या भेटीला जात़ तो दिवस होता. धुलीवंदनाचा़ सुमारे सव्वा दोनशे वर्षांपूवीर्ची परंपरा पुण्यातील अनेक घराण्यांनी आजही जपली आहे़. आपल्या घरातील मारुतीचे टाक घेऊन वीर मारुती मंदिरातील हनुमानरायाची भेट घडवून आणण्यासाठी गुरुवारी एकच गर्दी झाली होती़.
शहराच्या विस्तारामुळे आता ही कुटुंबे आता उपनगरात तसेच परगावी स्थायिक झाली आहेत़. तरीही धुळवडीच्या दिवशी ते आवर्जुन शनिवार पेठेतील वीर मारुती मंदिरात दर्शनासाठी येताना दिसतात़.
याबाबत कालीदास नाईक यांनी सांगितले की, पेशव्याच्या वेळी विजयी वीर एकत्र जमण्याची शनिवार पेठेतील वीर मारुती मंदिर ही जागा होती़. ते आपल्या शस्त्रांसह मारुतीचे दर्शन घेत असत़. त्यानंतर येथून ते पेशव्यांना भेटायला जात़ पुढच्या पिढ्यांनी ही परंपरा सुरु ठेवली़. त्यांनी आपल्या मारुतीचे टाक करुन ठेवले आहेत़. धुळवडीच्या दिवशी घरातील टाक वाजत गाजत घेऊन येऊन वीर मारुतीची भेट घडवत असत़. काळाबरोबरच ही लोक काम, व्यवसायानिमित्त लोक शहराच्या उपनगरात काही दुसऱ्या गावात स्थायिक झाले़ असे असले तरी आम्ही ही परंपरा जपली आहे़. आम्ही सध्या सिंहगड रोडवर राहतो़ तेथून देवघरातून मारुतीचे टाक नारळाच्या वाटीत घेऊन ते एका शुभ्र कपड्यांमध्ये घेतले जातात़. आमची मुले हे पारंपारिक वेशात एका हातात तलवार व दुसऱ्या हातात टाक घेऊन येतात़. ते मारुतीसमोर ठेवून देवाची भेट घडवितात़.
या दिवशी वीर मारुती मंदिरात सुमारे ५०० जण दर्शनासाठी येत असतात़. मला जसे कळायला लागले तेव्हापासून आमची चौथी पिढी ही परंपरा पुढे नेत आहे़.