सौभाग्याचं लेणं परत मिळाल्याने संक्रांतीचा आनंद गोड, पुणे पोलिसांनी परत केला १ कोटी रुपयांचा मुद्देमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 05:21 AM2018-01-13T05:21:57+5:302018-01-13T05:22:12+5:30
चोरट्यांनी लुटून नेलेला महिलांच्या दृष्टीने अतिशय मौल्यवान दागिना असलेले सौभाग्याचे लेणं आता परत मिळाल्याची आशा वाटत नसतानाच पुणे पोलिसांनी चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून चोरीचा ऐवज हस्तगत केला गेला आणि आज तो समारंभपूर्वक त्यांना परतही केला.
पुणे : चोरट्यांनी लुटून नेलेला महिलांच्या दृष्टीने अतिशय मौल्यवान दागिना असलेले सौभाग्याचे लेणं आता परत मिळाल्याची आशा वाटत नसतानाच पुणे पोलिसांनी चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून चोरीचा ऐवज हस्तगत केला गेला आणि आज तो समारंभपूर्वक त्यांना परतही केला़ सौभाग्याचं लेणं परत मिळाल्याने संक्रांतीचा आनंद गोड झाल्याची भावना महिलांनी व्यक्त केली़ पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत झालेल्या गुन्ह्यांमधील चोरीस गेलेले हिरे, सोने, चांदीचे दागिने पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत केले असून ते ७३ फिर्यादींना पुन्हा प्रदान करण्याचा कार्यक्रम शुक्रवारी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात आयोजिण्यात आला होता़ या वेळी आपले चोरीला गेलेले दागिने परत मिळत असल्याचे पाहून अनेक महिलांना आपले अश्रू आवरणे शक्य झाले नाही़ काहींनी पोलिसांना पेढे भरवून आपला आनंद व्यक्त केला़
शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात ७३ गुन्ह्यांतील ३ किलो ५६२़६६ ग्रॅम सोन्याचे दागिने, ७२६ ग्रॅम चांदीचे दागिने व रोख रक्कम असा १ कोटी १ लाख ८ हजार ३०३ रुपयांचा ऐवज परत करण्यात आला़ यापूर्वीही गेल्यावर्षी २०१७ मध्ये ४ कार्यक्रमांतून २ कोटी ३ लाख रुपयांचा ऐवज फिर्यादींना पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते परत करण्यात आला होता़ या वेळी सहआयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त आयुक्त रवींद्र सेनगावकर, प्रदीप देशपांडे उपस्थित होते़
या कार्यक्रमात ४२ लाख रुपयांचा ऐवज गौरव चोरडियांना परत मिळाला़ गौरव चोरडिया (मार्केट यार्ड) म्हणाले, की गेल्या वर्षी दसºयादिवशी आमच्या घरात घरफोडी झाली होती़ हे समजल्यानंतर १० मिनिटांत पोलीस आले़ या दागिन्यांमध्ये आपल्या आईच्या, आजीच्या आठवणी दडलेल्या होत्या़ तेच दागिने चोरीला गेल्याने त्यांना सर्वस्व गेल्याचे दु:ख होत होते़ पुढच्या दोनच दिवसांत पोलिसांनी चोरट्यांना पकडले़ त्यांच्याकडून सर्वच्या सर्व दागिने हस्तगत केले़ ते जसेच्या तसे परत मिळत असल्याचे पाहून खूप आनंद झाला़
पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला म्हणाल्या, की चोरीला गेलेला ऐवज त्यांना परत मिळावा, असा आमचा प्रयत्न असतो़ आज येथे पोलिसांचे कौतुक होत आहे़ ही सर्व पोलिसांची कामगिरी आहे़ पोलिसांवर विश्वास ठेवा़ वाहतुकीचे नियम पाळून पोलिसांना सहकार्य करा़ आपल्याजवळ चौकात, उन्हातान्हात पोलीस उभा असले तर त्यांची विचारपूस करा़ पुणेकरांचे सहकार्य मिळाले, तर देशात पुणे पोलीस एक नंबरवर येणार आहे़
अतिरिक्त पोलीस आयुक्त
प्रदीप देशपांडे यांनी प्रास्ताविक केले़ विवेक देव यांनी सूत्रसंचालन केले़ पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी आभार मानले़
नमिता गायकवाड (सनसिटी, सिंहगड रोड) : पायी जात असताना चोरट्यांनी माझ्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले होते़ ते परत मिळण्याची आशा सोडून दिली होती़ पण सोन्यासारखे काम करणारी माणसं असल्याने आज आम्हाला हे सोने परत मिळाले आहे़
वर्षा टाकळकर (पिंपरी) : गणेशोत्सवात कॅरीबॅगला कट मारून चोरट्याने दागिने चोरून नेले होते़ ते
परत मिळतील, अशी अपेक्षा नव्हती़
पण, पोलीस विश्वास देत होते आणि तो खराही ठरला आहे़