चित्रपटसृष्टीच्या भगवीकरणाचा डाव - योगेंद्र यादव
By admin | Published: June 15, 2015 09:16 AM2015-06-15T09:16:06+5:302015-06-15T09:16:35+5:30
भारतीय चित्रपट व दुरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीमुळे संस्थेचे अवमुल्यन झाले आहे.
पुणे : भारतीय चित्रपट व दुरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीमुळे संस्थेचे अवमुल्यन झाले आहे. भाजप सत्तेत आल्यापासून देशातील अशा महत्वाच्या संस्थांवर अशा लोकांची नियुक्ती केली जात आहे. यामुळे देशातील या संस्थांवर दुरगामी परिणाम होतील, अशी टीका स्वराज्य अभियानाचे प्रा. योगेंद्र यादव यांनी केली. चौहान यांच्या नियुक्तीवरून 'एफटीआयआय'मधील विद्यार्थ्यांनी मागील तीन दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. प्रा. यादव हे रविवारी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी संस्थेत आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत चौहान यांच्या नियुक्तीवरून भाजपा सरकारवर टीका केली. यादव म्हणाले, देशात अनेक अशा संस्था आहेत, त्यावर प्रत्येकाला गर्व आहे. भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून या संस्थांची स्वायत्तता धोक्यात आली आहे. त्यांच्या स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे. गिरीश कर्नाड यांच्यासह अनेकांनी या संस्थेचे अध्यक्षपद भुषविले आहे. मात्र चौहान यांच्या नियुक्तीने संस्थेचे अवमुल्यन झाले आहे. मोठय़ा संस्थांच्या प्रमुखपदी नियुक्ती कराव्यात अशा व्यक्ती भाजपामध्ये सापडत नाहीत. त्यामुळे त्यांनी नियुक्त केलेल्या व्यक्तींकडे पाहिल्यानंतर हसावे की रडावे अशी अवस्था होते. भारतीय मुल्य, संस्कृती, संस्थांचा इतिहास या लोकांना माहित नाही. चांगल्या लोकांना काढून ते असे लोक बसवत आहेत. भविष्यात याचे दुष्परिणाम होतील, याची त्यांना कल्पना नाही, असे प्रा. यादव यांनी नमुद केले. हे तर संस्थेचे अवमूल्यन : योगेंद्र यादव एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिल्यानंतर संवाद साधताना योगेंद्र यादव. पुणे : पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाशी निगडित असलेल्या पहलाज निहलानी यांची सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड केली आणि आता त्याच पक्षाशी निगडित असलेल्या गजेंद्र चौहान यांची एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड केली. यावरून मोदी सरकारने चित्रपटसृष्टीच्या भगवीकरणाचा डाव आखला आहे, असा गंभीर आरोप माहितीपट निर्माते आनंद पटवर्धन यांनी रविवारी केला.
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) येथे चौहान यांच्या निवडीविरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या बेमुदत आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज पटवर्धन आले होते. या वेळी त्यांनी हा आरोप केला. गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला यापूर्वीच 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'ने (एनएसडी) पाठिंबा दिला असून, आज पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांना सर्मथन दिल्याने आता हे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. एफटीआयआयच्या कॅम्पसमध्ये आजही विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत चौहान यांना हटविण्याची मागणी केली.
या वेळी पटवर्धन म्हणाले, ''चिल्ड्रन फिल्म सोसायटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी 'भीष्म पितामह' म्हणजेच मुकेश खन्ना यांची निवड करण्यात आली आहे. तर आता एफटीआयआय नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी 'युधिष्ठिर'ची म्हणजेच गजेंद्र चौहान यांची निवड करण्यात आली आहे. आता या महाभारतातील फक्त 'कृष्ण'च येण्याचा राहिला आहे. मोदी सरकार आल्यानंतरच या सर्व क्षेत्राचे भगवीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चौहान यांना केलेला विरोध योग्य आहे.''
ते म्हणाले, ''ही निवड कशाच्या आधारावर करण्यात आली, त्यासाठी कोणत्या तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला, याचा खुलासा सरकारने करायला हवा. मात्र, सरकार हा खुलासा करीत नसल्याने चौहान यांची निवड राजकीय वरदहस्त असल्याने अपारदश्री पद्धतीने करण्यात आल्याचे सिद्ध होत आहे.''