देवाची आळंदीत चक्का जाम
By admin | Published: May 8, 2017 02:01 AM2017-05-08T02:01:35+5:302017-05-08T02:01:35+5:30
आपण तीर्थक्षेत्र आळंदीत विवाहाला येताय? तर किमान दीड तास अगोदर अलंकापुरीत पोहोचा; कारण येथील वाहतूककोंडीतून फार
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलपिंपळगाव : आपण तीर्थक्षेत्र आळंदीत विवाहाला येताय? तर किमान दीड तास अगोदर अलंकापुरीत पोहोचा; कारण येथील वाहतूककोंडीतून फार मोठी कसरत करून तुम्हाला इच्छित स्थळी पोहोचावे लागणार आहे. रविवारी (दि. ७) लग्नसभारंभाची तिथी असल्याने शहरातील सर्वच रस्त्यांवर चक्का जाम होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिणामी मिळेल त्या पर्यायी रस्त्याने वाटसरूंना मार्गस्थ व्हावे लागत आहे.
आळंदीतील वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून शहरातील प्रमुख चौकांमध्ये तासन्तास वाहनांना ब्रेक लावून ताटकळत उभे राहावे लागत आहे. एकदा रस्त्यावर कोंडी झाली, की ती तब्बल दोन-अडीच तासांहून अधिक वेळ सोडविणे मुश्कील बनत आहे. वाढत्या वाहतूककोंडीच्या समस्येला समस्त अलंकापुरीसह चालक, वाहक, प्रवासी कंटाळले आहेत. शहरातील रस्त्यांवर सायंकाळच्या वेळी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे होणारे अतिक्रमण या समस्येत अधिक भर घालत आहे.
सध्या विवाहसभारंभाचे अधिक मुहूर्त असल्याने शहरातील विविध ठिकाणची विवाह कार्यालये, धर्मशाळा, मंदिरे आदी ठिकाणी गर्दीने गजबजलेली असतात. त्यामुळे बाहेरील गावावरून वऱ्हाडी लोकांची अनेक वाहने अलंकापुरीत येत असतात. मात्र अशा वाहनांना आवश्यक प्रमाणात पार्किंगची सोय उपलब्ध नसल्याने ही वाहने रस्त्याशेजारीच पार्किंग केली जात आहेत.
तसेच शहरात तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत रस्त्यांची कामे सुरू असल्याने इतर वाहनांना वाहतुकीदरम्यान रस्ता अपुरा पडत आहे. त्यामुळे वाहतूककोंडी अधिक प्रमाणात होऊ लागली आहे.