सिंहगडावर जाताय, मग सावधान! ५०० रूपये दंड अन् होईल गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:09 AM2021-06-19T04:09:16+5:302021-06-19T04:09:16+5:30
पुणे : मस्त बरसणारा पाऊस...वाफाळलेला चहा...गरम गरम कणसं- शेंगा...पिठलं-भाकरी खायची म्हटली की, पर्यटकांची पावले हमखास सिंहगडाकडे वळतात. मात्र, शासनाने ...
पुणे : मस्त बरसणारा पाऊस...वाफाळलेला चहा...गरम गरम कणसं- शेंगा...पिठलं-भाकरी खायची म्हटली की, पर्यटकांची पावले हमखास सिंहगडाकडे वळतात. मात्र, शासनाने निर्बंध शिथिल केले असले तरी पर्यटन स्थळे अद्यापही पर्यटकांसाठी बंद आहेत. गेल्या आठवड्यात रविवारी झालेली पर्यटकांची गर्दीमुळे आता हवेली पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. आता दर शनिवारी आणि रविवारी तसेच इतर दिवशी खडकवासला धरण, पानशेत, सिंहगड किल्ला परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना प्रत्येकी ५००/- रुपये दंड आकारण्यात येणार आहे. याशिवाय या आठवड्यात नियम मोडून येणाऱ्या लोकांवर आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात येणार असल्याची माहिती हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी 'लोकमत' ला दिली.
पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार सिंहगड किल्ला व आजुबाजूची पर्यटन स्थळे अद्यापही पर्यटकांसाठी बंद आहेत. तरीही खडकवासला धरण, पानशेत, सिंहगड किल्ला परिसरात फिरण्यासाठी पर्यटक गर्दी करीत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पर्यटकांची गर्दी थांबवण्यासाठी हवेली पोलिसांनी आदेशाचा भंग करण्याविरुद्ध कारवाईचा इशारा दिला आहे. दर आठवड्यातील शनिवारी आणि रविवारी तसेच इतर दिवशी खडकवासला धरण, पानशेत, सिंहगड किल्ला परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना दंड आकारण्यात येणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.
----------------------------------------